पुणे : रुग्णाचा मृत्यू, तसेच रुग्णालयातील बिल माफ करण्यासाठी डाॅक्टरांना वेठीस धरून रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी दिला. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून गोंधळ घातला जातो. रुग्णालयाचे बिल माफ करण्यासाठी डाॅक्टरांना धमकावले जाते. काही वेळा रुग्णालयात तोडफोड करून डाॅक्टर, तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते. अशा तक्रारी डाॅक्टरांकडून पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. याबाबत शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या संघटनेने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली.
रुग्णालय, तसेच डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्यांवर अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले. रुग्णालय प्रशासन किंवा डॉक्टरांविषयी तक्रार असेल तर इंडियन मेडिकल असोसिएशनकडे तक्रार करता येते. रुग्णालय प्रशासन, डाॅक्टर दोषी असतील तर त्यांच्यावर इंडियन मेडिकल असोसिएशनकडून कारवाई केली जाते. मात्र, डाॅक्टरांना वेठीस धरून कायदा हातात घेणे चुकीचे आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘टोइंग’च्या सरसकट भुर्दंडातून सुटका, कारवाईच्यावेळी वाहनचालक उपस्थित असल्यास केवळ ‘नो-पार्किंग’चा दंड
उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून रुग्णालयात गोंधळ घातला जातो. रुग्णालयात तोडफोड केली जाते, तसेच डाॅक्टरांवर हल्ला केला जातो. रुग्णालयाविरुद्ध तक्रार असेल तर नातेवाईकांनी योग्य मार्गाचा वापर करावा. इंडियन मेडिकल असोसिएशनकडे तक्रार करावी. मात्र, कायदा हातात घेऊन डाॅक्टरांना वेठीस धरून तोडफोड करण्याचे प्रकार चुकीचे आहेत. त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र कलमांन्वये कारवाई करण्याचे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आले आहेत.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त