पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून वेगवेगळ्या भागात कारवाई करुन २५ लाख ५१ हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले. त्यामध्ये मॅफेड्रॉन आणि गांजाचा समावेश आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध मार्केट यार्ड आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ मुक्त पुणे ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथक विमाननगर परिसरात गस्त घालत होते. लोहगाव- वाघोली रस्त्यावर एक जण थांबला असून, तो मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून कुमेल महंमद तांबोळी (वय २८, रा. धानोरी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून १९ लाख १७ हजार ३०० रुपयांचे ८३ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्केट यार्डात भागात गांजा विक्री प्रकरणात सैफन उर्फ शफिक इस्माइल शेख (वय ५२, रा. आनंदनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सात हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. सैफन गांजा विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अजीम शेख यांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. विमाननगर भागात मेफेड्रोन विक्री प्रकरणात किरण भाऊसाहेब तुजारे (वय २४, रा. आव्हाळवाडी, वाघोली) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सहा लाख २७ हजार रुपयांचे ३० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. तुजारे मेफेड्रोन विक्री करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी संदीप शिर्के यांना मिळाली होती. त्यानंतर कारवाई करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोीलस कर्मचारी साहिल शेख, रवींद्र रोकडे, संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी, आझाद पाटील, योगेश मांढरे, विनायक साळवे, दत्ताराम जाधव, विशाल दळवी यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader