मंगळवार पेठेत पहाटेपर्यंत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पहाटे छापा टाकून ३६ जणां विरोधात गुन्हा दाखल केला. याच जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने महिनाभरापूर्वी छापा टाकून कारवाई केली होती. पोलिसांची कारवाई झाल्यानंतर पुन्हा तेथेच जुगार अड्डा सुरू झाला. मध्यरात्री उशीरा सुरू होणाऱ्या जुगार अड्ड्यात वातानुकुलून यंत्रणा होती तसेच पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकरणी जुगार अड्डयाचा मालक अप्पा उर्फ भीमाशंकर कुंभार (वय ६७, रा. नाना पेठ) याच्यासह त्याचा मुलगा वीरेश (‌वय ३९, रा. पौड फाटा), सुमीत नरेश भाटीया (वय २९), दीपक सुभेदार परदेशी (वय २२), सोनू अर्जुनसिंग (वय २८), सुरेश रुपना कुमावत (वय २६), अशोक भगवान वाघमारे ( ५५), धनाजी बाबुराव खाडे (वय ४६), श्रवण राम कुमावत ( वय ३२), अरुण शिवनंदन सिह (वय ४३), राकेश रामशिंग ठाकूर (वय ३८) यांच्यासह ३६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

अप्पा कुंभारने मंगळवार पेठेत जुगार अड्डा सुरू केला होता. गेल्या महिन्यात तेथे सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक आणि पथकाने छापा टाकला होता. त्या वेळी कुंभारसह साथीदारां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कुंभारने पुन्हा जुगार अड्डा सुरू केला. रात्री उशीरा जुगार अड्डा सुरू व्हायचा. ज्या इमारतीत अड्डा होता. तेथे बाहेरुन कुलुप लावलेले असायचे. त्यामुळे पुन्हा जुगार अड्डा सुरू झाल्याची माहिती पोलिसांना देखील नव्हती. जुगार खेळण्यासाठी फक्त ओळखीतील व्यक्तींना प्रवेश देण्यात येत होता. जुगार अड्डा वातानुकूलित होता. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कारवाई झाल्यास त्वरीत बाहेर पडण्यासाठी शेजारी वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूने जुगार खेळण्यासाठी आलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी वेगळा रस्ता तयार करण्यात आला होता, असे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक आणि पथकाने ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime branch police raids on air conditioned gambling den cctv cameras installed to avoid police action pune print asj