Pune Crime Files : ९ ऑक्टोबर २०१५ ची सकाळ उजाडली ती पुण्यातल्या कात्रज भागात असलेल्या सुखसागर नगर भागाला हादरवणारी ठरली. कारण एक वृद्ध माणूस त्याच्या पत्नीचं कापलेलं शीर घेऊन आणि दुसऱ्या हाती कुऱ्हाड घेऊन रस्त्यावरुन फिरत होता. हा प्रकार पाहून अनेक लोक घाबरले तसंच काहींनी पोलिसांना याबाबत फोनवरुन माहिती दिली. काही लोकांनी या माणसाचे फोटोही काढले. एका माणसाच्या हाती त्याच्या पत्नीचं शीर आहे आणि दुसऱ्या हातात कुऱ्हाड आहे हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. या प्रकरणाचं नेमकं काय झालं? आपण जाणून घेणार आहोत.
पोलिसांनी रामचंद्र चव्हाणला कशी केली अटक?
हातात पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर घेऊन फिरणाऱ्या वृद्धाचं नाव रामचंद्र चव्हाण असं होतं. मोटरसायकलवरुन जाणाऱ्या एका माणसाने त्यांना पाहिलं आणि त्याने या धक्कादायक घटनेची माहिती पुढच्या चौकात असलेल्या वाहतूक पोलिसाला दिली. व्ही. के. कुमार, डी. एन. जगताप आणि भालचंद्र तन्वर हे तिघेही वाहतूक पोलीस या ठिकाणी पोहचले. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण आणि पोलीस हवालदार राहुल कदम तसंच मुकंद पवार हेदेखील घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी या प्रकरणात वृद्ध आरोपी रामचंद्र चव्हाणला अटक केली. त्याच्या हातात असलेलं त्याच्या पत्नीचं शीर आणि कुऱ्हाड हे दोन्ही ताब्यात घेतलं. पोलिसांनी या वृद्धाला म्हणजेच रामचंद्र चव्हाणला पोलीस भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर त्यांनी त्याच्या पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
सोनाबाई चव्हाण यांची हत्या, हत्येनंतर शीर केलं धडावेगळं
पोलिसांनी जेव्हा या वृद्धाची चौकशी केली तेव्हा त्याने त्याचं नाव रामचंद्र शेऊ चव्हाण असल्यचं सांगितलं. तसंच माझ्या हातात माझी पत्नी सोनाबाई चव्हाणचं शीर होतं असंही सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र चव्हाण हा मूळचा गुलबर्गा या ठिकाणी राहणारा होता. मात्र ४० वर्षांपूर्वी तो पुण्यात आला आणि इथेच वास्तव्य करु लागला. सुखसागर नगर या ठिकाणी असलेल्या गंगा ओसियन पार्क या इमारतीत तो वॉचमनचं काम करत होता. तसंच या ठिकाणी असले्ल्या एका घरात तो पत्नीसह राहात होता. त्याची मुलं राजेश, उमेश आणि सून सुनीता तसंच दोन नातू असं कुटुंबही त्याच्याच बरोबर होतं. त्याच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. त्या दोघीही पुण्याच्या बाहेर राहतात.
रामचंद्रने पत्नी सोनाबाईची हत्या का केली?
आपल्या पत्नीचे नातेवाईकांपैकी कुणाबरोबर तरी अनैतिक संबंध आहेत असा संशय रामचंद्र चव्हाण यांना होता. यावरुन त्यांच्यात खटके उडत होते. ज्यादिवशी सोनाबाईंची हत्या झाली त्यादिवशीही या दोघांचं भांडण झालं होतं. यावेळी त्यांची मुलं कामावर गेली होती. या दोघांचं भांडण जेव्हा विकोपाला गेलं त्यानंतर रामचंद्रने त्याच्या सुनेला आणि नातवांना एका खोलीत बंद केलं आणि कुलूप लावलं. त्यानंतर कुऱ्हाडीने सोनाबाईवर वार केले आणि त्यांचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर रामचंद्र चव्हाणने ते शीर आणि कुऱ्हाड हाती घेतलं आणि तो रस्त्यावरुन चालू लागला ज्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला अशी माहिती पोलिसांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
रामचंद्र चव्हाणला ३०२ आणि ४९८ या कलमांखाली अटक
रामचंद्र चव्हाणला कलम ३०२ च्या अंतर्गत अटक करण्यात आली. कलम ४९८ च्या अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणात सुनेने दिलेल्या जबाबानंतर FIR दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात रामचंद्र चव्हाणच्या कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले. ज्यांनी रामचंद्रला पत्नीचं शीर हाती घेऊन जाताना पाहिलं होतं त्या प्रत्यक्षदर्शी लोकांचेही जबाब नोंदवले. रामचंद्र चव्हाणची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती असं पोलिसांनी स्पष्ट केलं. त्याने रागाच्या भरात पत्नीची हत्या केली असा आरोप आहे. जेव्हा रामचंद्र चव्हाणला पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यासाठी नेलं होतं तेव्हा महिलांच्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी रामचंद्र चव्हाणला सुरक्षित स्थळी हलवलं होतं.
जानेवारी २०१६ मध्ये काय घडलं?
जानेवारी २०१६ मध्ये पोलिसांनी या प्रकरणातली चार्जशीट पुण्यातल्या मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर ठेवली. तसंच पोलिसांनी रामचंद्रच्या पत्नीचा म्हणजेच सोनाबाईंचा शवविच्छेदन अहवालही सादर केला. सोनाबाईंच्या शरीरावर २६ वार होते. तसंच नंतर तिचं शीर धडावेगळं कऱण्यात आलं होतं असं या अहवालात नमूद आहे. रामचंद्र चव्हाणने कोर्टाला सांगितलं की ही हत्या त्याने केली नाही. मात्र न्यायलायने त्याला तुरुंगातच ठेवलं आहे. दरम्यान या प्रकरणात बचाव पक्षाचे वकील म्हणाले की अद्यापही हे प्रकरण न्यायलायत प्रलंबित आहे. आम्ही २० हून साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. अद्याप पोलिसांचे साक्षीदार तपासणं बाकी आहे.