पुणे : अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तोतया पोलिसाने तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोतयाने तरुण राहत असलेल्या खोलीतून पैसे आणि लॅपटॉप लांबविले असून त्याचा वारजे पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा >>> पुणे : पालखी सोहळ्याला पाणीटंचाईचा फटका? टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय

याप्रकरणी चिन्मय मोहन देवकाते (रा. माडा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी अनिलराव मुळे (वय २६, रा. हिंगणे होम कॉलनी , कर्वेनगर ) याने या संदर्भात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकी आणि त्याचे तीन मित्र हिंगणे होम कॉलनीत भाडेतत्वावर खोली घेऊन राहत आहेत. देवकातेने त्यांच्याकडे पोलीस दलात नोकरीला असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर तो त्यांच्या बरोबर खोलीत राहू लागला. देवकाते नेहमी पोलीस गणवेशात असायचा. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असून अनुकंपा तत्वावर पोलीस दलात नोकरी लावून देतो, अशी बतावणी देवकातेने केली होती.

हेही वाचा >>> जालना : सोसायटी निवडणुकीत काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल पराभूत

देवकातेच्या बतावणीवर विश्वास ठेवून विकी आणि मित्रांनी त्याला एक लाख रुपयांहून जास्त रक्कम दिली होती. पैसे दिल्यानंतर देवकातेकडे त्यांनी विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

हेही वाचा >>> पंजाबमध्ये दरोडा टाकून केली कोटीची लूट; चार आरोपींना कोल्हापुरात अटक

विकी आणि त्याच्या मित्रांना देवकातेबाबत संशय आला. विकी आणि त्याचे मित्र बाहेर गेल्यानंतर देवकाते खोलीत ठेवलेले लॅपटॅाप आणि पैसे घेऊन पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विकी आणि मित्रांनी पोलिसांकडे तक्रार दिली. देवकातेचे छायाचित्र त्यांनी पोलिसांना दिले असून पोलीस उपनिरीक्षक होळकर तपास करत आहेत.

Story img Loader