गर्दीने सदैव गजबजलेल्या सदाशिव पेठेतील फडतरे चौकातील एका इमारतीत तीन वर्षांपूर्वी झालेल्या आशा लगड (वय ७२) यांच्या खूनप्रकरणाचा छडा लावण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. मात्र त्या प्रयत्नांना अखेपर्यंत काही यश आलेच नाही. अखेर पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास बंद केला. ‘गुन्हा खरा आहे; पण आरोपी मिळून येत नाही,’ असा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर करून या खूनप्रकरणाचा तपास थांबविला.

सदाशिव पेठेतील फडतरे चौकात असलेल्या लक्ष्मी निवास इमारतीत चौथ्या मजल्यावरील सदनिकेत आशा लगड या ज्येष्ठ महिला एकटय़ाच राहत होत्या. त्यांचा मुलगा व सून नारायण पेठेत राहायला आहेत. आशा लगड ३ जून २०१३ रोजी आळंदीला गेल्या होत्या. आळंदीहून त्या सायंकाळी घरी परतल्या. रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा खून करण्यात आला होता. त्यांचे शेजारी विकास दामले यांनी एकटय़ा राहणाऱ्या लगड यांच्या घरात पाहिले असता त्यांना त्या बेशुद्धावस्थेत कॉटवर पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती नारायण पेठेत राहणाऱ्या लगड यांच्या मुलाला दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात ही माहिती कळविण्यात आली. एकटी राहणारी ज्येष्ठ महिला मृतावस्थेत सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा कपाटातील रोकड व लगड यांच्या अंगावरचे दागिने असा २ लाख ८६ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे व विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांनी तातडीने तपास सुरू केला. सुरुवातीला लगड यांचा खून हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा संशय होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात लगड यांचा मृत्यू डोक्याला गंभीर इजा झाल्याचे स्पष्ट झाले. गजबजलेल्या सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचा खून झाल्याने पोलीसही हादरून गेले होते. प्राथमिक तपासात चोरीच्या उद्देशाने खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी फडतरे चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपलेल्या चित्रीकरणाची पडताळणी करण्यात आली.

लगड राहत होत्या ती लक्ष्मी निवास इमारत ही लगड यांच्या मालकीची होती. या इमारतीत कपडे विक्रीची दुकाने आहेत. तेथील कामगारांची पोलिसांनी चौकशी केली. शेजारी राहणाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र, काही केल्या तपासासाठी आवश्यक असणारा ठोस असा दुवा पोलिसांना मिळाला नाही. लगड खूनप्रकरणात पोलिसांनी जवळपास ५० जणांची चौकशी केली. लक्ष्मी निवास इमारतीत दुकाने आहेत. या घटनेनंतर तेथील कामगार व त्यांना जेवणाचे डबे पुरविणाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली होती. तसेच लगड यांच्या नातेवाइकांकडेही चौकशी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले नाहीत. या घटनेचा तपास करणारे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत यांनी तपास कशा पद्धतीने करण्यात आला होता त्याची माहिती सांगितली.

लगड यांचा खून मालमत्तेच्या वादातून झाल्याचा संशय होता. मात्र, तपासात पोलिसांना या शक्यतेला पुष्टी देणारे धागेदोरे सापडले नाहीत. इतरही शक्यता लक्षात घेऊन तपास करण्यात आला. मात्र काही उलगडा झाला नाही. तीन वर्षे हा तपास सुरू होता. अखेर या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. जून २०१६ रोजी खूनप्रकरणाला तीन वर्षे पूर्ण झाली. पोलिसांनी खूनप्रकरणाचा तपास करण्यासाठी परिश्रम घेतले. मात्र, आरोपींचा शोध न लागल्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा तपास बंद करण्याचा अहवाल (ज्याला ‘ए-फायनल’ असे म्हटले जाते) न्यायालयाला सादर केला. एखादा गुन्हा घडल्यानंतर तपास करूनही आरोपींपर्यंत पोहोचण्यास अपयश आल्यानंतर तपास बंद करण्याचा अहवाल न्यायालयाला सादर केला जातो. त्यानुसार या प्रकरणाचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यात आला, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.