अंगावर घाण पडल्याची बतावणी करून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात रोकड लंपास करण्याच्या घटनांमध्ये गेल्या महिनाभरात मोठी वाढ झाली होती. विशेषत: बँकांमधून रोकड काढून निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून रोकड लांबवण्याचे प्रकार घडत होते. चिंचवड भागात बँकेतून रोकड काढून निघालेल्या महिलेकडील पर्स हिसकावण्याचाही प्रयत्न झाला होता. अशा प्रकारचे गुन्हे करण्यात वाकबगार असलेली टोळी पुण्यात सक्रिय झाल्याचे लक्षात आल्यानंतर या टोळीला पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे होते. पोलिसांनी तपासकौशल्याचा वापर करून ही टोळी नुकतीच जेरबंद केली. विशेष म्हणजे या टोळीत अल्पवयीन मुले आणि महिलांचा देखील सहभाग आहे. या टोळीकडून चिंचवड पोलिसांनी २७ तोळे दागिने आणि रोकड मिळून साडेदहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

चेन्नई भागातील चोरटे अंगावर घाण पडल्याची बतावणी करून रोकड लंपास करण्यात तरबेज आहेत. चेन्नईतील चोरटय़ांच्या टोळीने अशा प्रकारचे गुन्हे देशभरात केले आहेत. त्यामुळे पुणे परिसरात सक्रिय झालेले चोरटे चेन्नईतील असावेत, असा संशय सुरुवातीला पोलिसांना होता. मात्र, असे गुन्हे करण्यात मध्य प्रदेशातील चोरटय़ांची टोळी सक्रिय झाल्याचीही माहिती समोर आली आहे. चिंचवड गावातील चापेकर चौकात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधून एक लाखाची रोकड काढून चिंचवड येथील निवासी कल्याणी प्रसाद मुंगसे निघाल्या होत्या. काही अंतरावर दबा धरून बसलेल्या अल्पवयीन मुलांनी त्यांच्या पाठीवर पावडरसदृश पदार्थ टाकला. कल्याणी यांच्या पाठीवर पावडर टाकल्यानंतर त्यांना असह्य़ वाटू लागले. त्याच वेळी एक मुलगा तेथे आला आणि त्याने त्यांना पाठीवर किडा असल्याचे सांगितले. त्या मुलाबरोबर असलेल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका उपाहारगृहातून पाणी आणले. ते पाणी त्याने मुंगसे यांच्या पाठीवर ओतले. हा सर्व प्रकार सुरू असताना एक वेळ अशी आली, की मुंगसे यांचे लक्ष पर्सकडे नव्हते. नेमकी हीच संधी त्या मुलाने साधली आणि मुंगसे यांनी त्यांच्या खांद्यात अडकवलेली पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून मुंगसे यांनी पर्स घट्ट पकडून ठेवली. पर्स हिसकावता न आल्यामुळे मुलांनी तेथून पळ काढला.

चिंचवड तसेच भोसरी परिसरात अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी घडले होते. त्यामुळे हा प्रकार घडल्यानंतर परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली आणि सहायक आयुक्त राम मांडुरके यांनी तातडीने चोरटय़ांना पकडण्याच्या सूचना दिल्या. चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. के. कुबडे, तपासपथकाचे सहायक निरीक्षक सतीश कांबळे यांनी तातडीने तपास सुरू केला. भोसरी भागात झालेल्या अशाच प्रकारच्या एका गुन्ह्य़ाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चित्रीकरण केले होते. तेथे एका सराफी दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे पोलिसांनी चित्रीकरणाची पडताळणी करून चोरटय़ांचा माग काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, सहायक निरीक्षक कांबळे यांना चिंचवड स्टेशन परिसरात संशयित चोरटे फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तपासपथकातील पोलिसांबरोबर तेथे धाव घेतली आणि सापळा लावला. पोलिसांनी तेथे दुचाकीस्वार राजू किसना अय्यर (वय २४) आणि सहप्रवासी शंकर राजू नायडू (वय २०, दोघेही सध्या रा. केसनंद फाटा, नगर रस्ता, मूळ रा. अण्णानगर, ता. हुजुरु, भोपाळ, मध्य प्रदेश) यांना संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांनी मूकबधिर असल्याचे सोंग केले. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली.

या संदर्भात सहायक निरीक्षक कांबळे म्हणाले, की चोरटय़ांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. ते दाक्षिणात्य भाषेत बोलत असल्यामुळे पोलिसांना सुरुवातीला अडचण आली. दुभाषाची मदत घेऊन त्यांना बोलते करावे लागले. त्यानंतर त्यांच्याबरोबर असलेल्या दोन महिला आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. या टोळीने भोसरी, चिंचवड आणि डेक्कन भागात आठ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, एक लाख ४५ हजार रुपयांची रोकड, दोन दुचाकी, सात मोबाइल असा १० लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपी अय्यर, नायडू आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिला सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील या टोळीकडून एक विशिष्ट प्रकारचे द्रव आणि पावडरसदृश पदार्थ जप्त करण्यात आले. ते न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा द्रवपदार्थ अंगावर टाकल्यास त्याचा घाण वास येतो. द्रवपदार्थ टाकून तसेच पावडर टाकून या टोळीने अशा प्रकारचे गुन्हे भोपाळ, आंध्र प्रदेश, मुंबई तसेच पुण्यात केले आहेत. सध्या एका टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक व्ही. के. कुबडे, सहायक निरीक्षक सतीश कांबळे, विलास होनमाने, विनोद साळवे, शांताराम हांडे, जयवंत राऊत, स्वप्नील शेलार, देवा राऊत, निवास विधाटे, विजय बोडके, रूपाली पुरीगोसावी यांनी ही कारवाई केली. मात्र, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आणखी काही टोळ्या शहरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना आहे.