कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तब्बल एकशे तीस एकरांवर पसरले आहे. महाराष्ट्रातील एक मोठे प्रसिद्ध प्राणिसंग्रहालय म्हणून ते ओळखले जाते. नानाविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, सर्प या उद्यानात आहेत. काही महिन्यांपूर्वी प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्याची जाळी तोडून तेथील घुबडांची चोरी झाली आणि शहरात ही चोरी चर्चेचा विषय ठरली. चोरी झालेली ही घुबडे कुठे गेली..? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे, तसाच तो नागरिकांमध्येही चर्चेत आहे.
खून, दरोडा, अपहरण, चोरी अशा गंभीर गुन्ह्य़ांचा तपास पोलिसांकडून केला जातो. मात्र, वन्यजीव अधिनियमानुसार घुबड चोरी हा देखील गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे पोलीसदेखील या गुन्ह्य़ाचा तपास लावण्याच्यादृष्टीने कसोशीने प्रयत्न करत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची उच्चांकी गर्दी होते. शाळांच्या सुटय़ांमुळे मोठय़ा संख्येने बाहेरगावांहून लोक येथे येतात. पुणेकर नागरिकदेखील आवर्जून उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना घेऊन या प्राणिसंग्रहालयात जातात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत पर्यटकांची मोठी गर्दी असते. उन्हाळ्याची ही सुटी संपल्यानंतर कात्रज येथील प्राणिसंग्रहालयातून घुबडे चोरीला गेली, ही बाबदेखील विचारात घेतली पाहिजे. घुबड चोरीमागे नियोजन असावे, असाही संशय पोलिसांना आहे. सन २००७ मध्ये प्राणिसंग्रहालयातून मोर चोरीला गेले होते. त्याचाही छडा अद्याप लागलेला नाही.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ निघोट यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वन्यजीव प्राणीसंरक्षण अधिनियमनाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव म्हणाले, की २६ जून रोजी कर्मचारी श्यामराव कांबळे यांनी प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची गणना सुरु केली होती. त्या वेळी घुबडाच्या पिंजऱ्याची जाळी तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पिंजऱ्यात गव्हाणी जातीचे एक घुबड आणि शृंगी जातीची दोन घुबडे होती. पिंजऱ्यातील तीन घुबडे चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती दिली. आम्ही पिंजऱ्याची पाहणी केली. घुबडे चोरीला गेली होती. त्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी पाहणी करून प्राणिसंग्रहालयातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती.
कात्रजचे प्राणिसंग्रहालय विस्तीर्ण आहे. येथे प्राण्यांसाठी स्वतंत्र खंदक खोदण्यात आले आहेत. पक्ष्यांसाठी स्वतंत्र पिंजरे आहेत. सन २००७ मध्ये प्राणिसंग्रहालयातून मोर चोरीला गेले होते. तेव्हापासून प्राणिसंग्रहालयाची सुरक्षाव्यवस्था आणखी सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले. प्राणिसंग्रहालयात दिवसा आणि रात्री मिळून पन्नास सुरक्षारक्षक बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. सुरक्षारक्षकांकडून प्राणिसंग्रहालयाच्या प्रत्येक भागात गस्त घालण्यात येते. तसेच दररोज प्राण्यांची गणतीदेखील करण्यात येते. एकशे तीस एकरांवर असलेल्या प्राणिसंग्रहालयातील प्रत्येक भागाची पाहणी नियमितपणे करण्यात येते. घुबडे चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर प्राणिसगं्रहालयाच्या प्रशासनाने पोलिसांना सहकार्य केले. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास झाला, मात्र अद्याप काही ठोस धागेदोरे हाती लागले नाहीत. पोलिसांकडून काही शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत आहे. सुरक्षारक्षकांची नजर चुकवून मध्यरात्री चोरटे प्राणिसंग्रहालयात शिरले असावेत, अशी शक्यता गृहीत धरुन तपास केला जात आहे. प्राणिसंग्रहालयाच्या प्रत्येक भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे चोरटय़ांची फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. कोणताही पुरावा हाती नसल्यामुळे पोलिसांची कामगिरी अवघड झाली असली तरी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु ठेवला आहे, अशी माहिती या चोरीच्या तपासाबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिली. वेगळ्या प्रकारचा हा गुन्हा असल्यामुळे घुबड चोरीचा तपास पोलिसांकडून कसोशीने करण्यात येत आहे आणि लवकरच चोरटय़ांना पकडू, असा विश्वासही पोलीस व्यक्त करत असले तरी अद्यापपर्यंत ही घुबडे कोठे गेली आणि कोणी नेली याबाबत ठोस काही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.