गजबजलेल्या नगर रस्त्यावरील गुंजन चित्रपटगृह चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटऱ्या भरदिवसा चोरील्या गेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रण कक्षाशी सुमारे वीस मिनिटे संपर्क तुटल्यानंतर बॅटरी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून बॅटरी चोरणाऱ्या एकाला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजीज इस्माईल शेख (वय ५०, रा.काळभोरनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अलाइड डिजिटल सव्‍‌र्हिसेसचे अभियंता सतीश जाधव (वय ३१) यांनी यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज्य सरकारकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे चौक, संवेदनशील ठिकाणांवर १२४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरे योजनेचे उद्घाटन वर्षभरापूर्वी झाले. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच देखभालीचे काम अलाइड डिजिटल सव्‍‌र्हिसेसकडे सोपविण्यात आले आहे.

नगर रस्त्यावर येरवडा भागात गुंजन चित्रपटगृहानजीक असलेल्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अचानक बंद पडले. शहरात बसविण्यात आलेले कॅमेरे पुणे पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही कॅमेरे नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आल्या आहेत. कॅमेरे बंद पडल्यानंतर अलाइड डिजिटल सव्‍‌र्हिसेसचे अभियंता जाधव यांनी गुंजन चित्रपटगृह चौकातील कॅमेऱ्यांची पाहणी केली. तेव्हा कॅमेरातील यंत्रणेशी जोडलेल्या तीन बॅटऱ्या चोरीला गेल्याचे उघड झाले. बॅटरी चोरीला गेल्यानंतर जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर मार्केट यार्ड पोलिसांकडून शेखला पकडण्यात आले.

बॅटरी चोर असा पकडला गेला..

येरवडय़ातील गुंजन चित्रपटगृह चौकातील बॅटरी शेखने चोरल्यानंतर त्याने मार्केट यार्ड भागातील एका भंगार माल खरेदी विक्री करणाऱ्या एकाला बॅटरी विकली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी अलाइड डिजिटल सव्‍‌र्हिसेसकडून वारण्यात आलेल्या बॅटऱ्या विशिष्ट रंगाच्या आहेत. या बॅटरी भंगारमाल विक्रेत्याकडे शेखने विकल्याची माहिती जाधव यांना मिळाली. त्यांनी मार्केट यार्ड पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी शेखला पकडले. त्याच्याकडून तीस बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत. शेख याने शहरातील अनेक ठिकाणाहून बॅटरी चोरल्या आहेत. तो इलेक्ट्रिशियन आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरीचोरीच्या घटना

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी खडक, शिवाजीनगर, खडकी, चतु:शृंगी, शिवाजीनगर, लष्कर, सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस देखील चक्रावून गेले होते.