वीस वर्षांपूर्वी खडकीतील मुळा रस्त्यावर पोलिसांच्या गाडीत शर्ट जाळून गाडी पेटवून देऊन पसार झालेल्या एकाला गुन्हे शाखेकडून नुकतीच अटक करण्यात आली. न्यायालयीन कामकाज संपवून कारागृहात नेत असताना चौघे जण पसार झाले होते. या प्रकरणातील एक आरोपी पकडला गेल्यामुळे त्याच्यासोबत पसार झालेले तीन साथीदार पकडले जातील, अशी आशा पोलिसांना आहे. त्यामुळे तिघांचा पोलिसांकडून पुन्हा शोध घेण्याचे काम सुरू आहे. वीस वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीकडून आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले आधार कार्ड आरोपीने उत्तर प्रदेशातून तयार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
वीस वर्षांपूर्वी पोलिसांच्या गाडीत आग लावून पसार झालेला राम यलाप्पा सोनावळे (वय ५४, रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसर) याला गुन्हे शाखेच्या युनिट एककडून नुकतीच अटक करण्यात आली. आरोपी राम सोनावळे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वीस वर्षांपूर्वी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनावळे याच्यासह चौदा आरोपींना १० सप्टेंबर १९९८ रोजी शिवाजीनगर न्यायालयात कामकाजासाठी आणले होते. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर सोनावळेसह चौदा जणांना येरवडा कारागृहात पोलीस गाडीतून (व्हॅन) नेण्यात येत होते. त्या वेळी मुळा रस्ता भागात स्मशानभूमीनजीक सोनावळे याच्यासोबत असलेले आरोपी बेनाराम सत्यनारायण गुप्ता (रा. लखनौ), मारुती तुकाराम पवार (रा.जामखेड, जि.अहमदनगर), राजू संदीप रोकडे उर्फ अनिल उत्तम लोंढे (रा. कान्हूर पठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांनी धावत्या गाडीत स्वत:च्या अंगावरील शर्ट काढले आणि काडय़ापेटीने शर्ट पेटवून दिले. त्यानंतर आरोपींनी गाडीला आग लागल्याचा बहाणा केला. धावपळीत चौदा आरोपी पोलिसांचे लक्ष चुकवून पसार झाले. त्यापैकी दहा जणांना पोलिसांकडून लगेचच पकडण्यात आले होते.
या गुन्हय़ात पसार असलेला आरोपी सोनावळे शिवाजीनगर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या वसाहतीत राहात होता. त्याची शिवाजीनगर परिसरात दहशत होती. पसार झाल्यानंतर तो परगावात राहात होता. वीस वर्षांपूर्वी दाखल असलेल्या गुन्हय़ातील फरार आरोपी सोनावळे शिवाजीनगर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या वाहनतळाच्या परिसरात थांबल्याची माहिती पोलीस हवालदार उमेश काटे आणि मोहन येलपले यांना शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत सोनावळेने वीस वर्षांपूर्वी खडकीतील मुळा रस्ता परिसरातून पोलीस गाडीला आग लागल्याचा बहाणा करून पसार झाल्याची कबुली दिली, असे गुन्हे शाखेच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, सोनावळे गेली वीस वर्षे पसार होता. त्याची पत्नी आणि दोन मुले शिवाजीनगर येथील एका वसाहतीत राहायला आहेत. तो पसार झाल्यानंतर कुठे गेला, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तो शिर्डीत वास्तव्यास असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. सोनावळेकडून पोलिसांनी एक आधार कार्ड जप्त केले आहे. त्याने हे आधार कार्ड उत्तर प्रदेशातून तयार करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तो काही काळ उत्तर प्रदेशात वास्तव्यास असल्याचा संशय आहे. सोनावळे पकडला गेल्यानंतर त्याचे साथीदार गुप्ता, पवार, रोकडे यांचा शोध घेण्यात येत आहे.
न्यायालयाने फरार घोषित केलेला आरोपी पकडणे हे पोलिसांचे काम आहे. सोनावळे पकडला गेल्यानंतर वीस वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्हय़ाच्या तपासाला चालना मिळाली आहे. अन्यथा या गुन्हय़ाचा तपास संपल्यात जमा होता. सोनावळेची चौकशी करून त्याला या गुन्हय़ाच्या तपासकामी खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सोनावळे याने पोलिसांना जुजबी माहिती दिली आहे. पोलिसांच्या गाडीत आग लावून पसार झालेले अन्य तीन आरोपी गुप्ता, पवार, रोकडे यांची माहिती त्याचाकडून मिळाली नाही. मात्र, सोनावळे पकडला गेल्यामुळे या गुन्ह्य़ाच्याा तपासाला चालना मिळाली आहे. गुप्ता, पवार, रोकडे यांना पकडण्यासाठी गुन्हे शाखेकडून पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तिघे जण पोलिसांना सापडतील, अशी आशा वाटते. गुन्हा गंभीर असो वा किरकोळ आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांचे काम आहे. आपण पोलिसांच्या हाती लागणार नाही, असे अनेक गुन्हेगारांना वाटते. पण गुन्हय़ाला एक दिवस तरी वाचा फुटते या न्यायाने पोलीस त्यांचे काम करत असतात. जरी पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळाले नाही तरी पोलिसांकडून आरोपींचा माग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतात, असे पोलीस निरीक्षक भोसले यांनी सांगितले.
govinddegvekar@expressindia.com