पुणे : दारु प्याल्यानंतर ताटात हात घातल्याने झालेल्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्या खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात मध्यरात्री घडली. तरुणाला बांबू, तसेच दगडाने मारहाण करून खून करण्यात आला. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आदित्य घोरपडे (वय २१ , रा. घोरपडे चाळ, गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश ऊर्फ नन्या परदेशी, तसेच त्याचा सावत्र भाऊ सुरेश शुक्ला यांच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत आदित्य याची आई राजश्री संतोष घोरपडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धायरी रस्त्यावरील त्रिमुर्ती किराणा दुकानासमोर मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा – पुणे : ‘बोपदेव घाट’ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य घोरपडे आणि त्याचे मित्र नऱ्हे येथील गॅलक्सी रेस्टो बार येथे दारु प्यायला गेले होते. दारु प्याल्यानंतर त्यांनी जेवण मागविले. जेवण करीत असताना आकाश हा आदित्य याच्या ताटात हात घालून खाऊ लागला. तेव्हा आदित्यने माझ्या ताटातील घेऊन कशाला खातो, अशी विचारणा केली. आदित्य आणि आकाश दारुच्या नशेत होते. त्यांच्यात तेथे वाद झाला. त्यानंतर आकाश तेथून निघून गेला. आदित्य आणि त्याचे मित्र जेवण करुन बाहेर पडले. धायरी रस्त्यावरील त्रिमूर्ती किराणा माल दुकानासमोर मध्यरात्री एकच्या सुमारास आकाश आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी आदित्यला गाठले. त्याला बांबूने बेदम मारहाण केली, तसेच त्याच्या डोक्यात दगड मारला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा – मरणानेही सुटका नाही!
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, अमोल झेंडे, निखिल पिंगळे, सहायक आयुक्त अजय परमार, साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, गुन्हे निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस निरीक्षक भोस तपास करत आहेत.