पुणे : दांडीया कार्यक्रमात तरुणावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइतासह साथीदारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अमित दीपक चोरगे (वय २७), अक्षय किसन सावंत (वय २८), अजय किसन रांजणे (वय २६), प्रसाद दत्तात्रय रांजणे (वय २२), सिद्धेश शिवाजी सणस (वय २६), विजय रघुनाथ रांजणे (वय १९, सर्व रा. आंबेगाव खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अर्जुन दिलीप मोरे (वय १९, रा. विश्वात्मक जंगली महाराज ट्र्स्ट, मोहिली, शहापूर, जि. ठाणे ) गंभीर जखमी झाला होता.
मोरे याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मोरे आणि त्याचा मामाचा मुलगा कात्रज भागातील संतोषनगर परिसरात ८ ऑक्टोबर रोजी रात्री दांडीयाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी सराइत अमित चोरगे आणि साथीदार तेथे आले. संतोषनगर परिसरात चोरगेची काहीजणांशी भांडणे झाली होती. वादातून चोरगे आणि साथीदारांनी दांडिया कार्यक्रमात कोयते उगारून दहशत माजविली. टोळक्याने कोयते उगारल्याने दांडीया कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले नागरिक पळाले. माेरे आणि त्याचा मामाचा मुलगा तेथून पळाले. पळताना मोरे पडला. त्यावेळी चोरगे आणि साथीदारांनी रस्त्यात पडलेल्या मोरेवर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. चोरगे आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार दहशत माजवून पसार झाले. पसार झालेल्या चोरगे आणि साथीदार कात्रज घाटात थांबल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सागर बोरगे, मितेश चोरमले यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्यांना पकडण्यात आले.
हेही वाचा – बीड जिल्ह्याच्या नेतृत्वाने ओबीसी-मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला – बजरंग सोनवणे
हेही वाचा – कचरा व्यवस्थापनाचा ‘कचरा’
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिणे, सहायक निरीक्षक समीर कदम, समीर शेंडे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, मितेश चोरमले, अवधूत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, नामदेव रेणुसे, चेतन गोरे यांनी ही कारवाई केली.