पुणे : खाद्यपदार्थ विक्रीची गाडी लावण्याच्या वादातून आचाऱ्याच्या डोक्यात तवा घालून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोघांना अटक केली.

विनोद नंदू दिखाव (रा. धानोरी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नौशाद इक्बाल उर्फ नाना शेख (वय ४१, रा. दिघी), अवधेश बहाद्दुर सिंग (वय ३३, रा. जलालपूर, गोंडा, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दुलारी देवी (वय ३८, रा. वाकडेवाडी, मुंबई-पुणे रस्ता) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुलारी देवी यांनी वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात चहा विक्रीची गाडी लावली होती. त्यांच्या गाडीशेजारी आरोपी नाना शेख ,अवधेश सिंग यांनी डोसा विक्रीची गाडी सुरू केली होती. या कारणावरुन दुलारी देवी आणि आरोपी शेख, सिंग यांच्यात वाद झाला होता. वादात दुलारी देवी यांच्याकडे काम करणारा आचारी विनोद दिखाव याने मध्यस्थी केली होती. गुरुवारी सकाळी त्यांच्यात वाद झाला. वादातून आरोपींनी आचारी विनोद याच्या डोक्यात तवा मारला. तवा मारल्याने विनोद गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट स्थानक परिसरात खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लावण्यात आल्या आहेत. खाद्यपदार्थ विक्री गाडी लावण्याच्या वादातून यापूर्वी या भागात हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. खाद्यपदार्थाची गाडी लावण्याच्या वादातून मध्यंतरी एकाच्या अंगावर उकळते तेल टाकण्यात आल्याची घटना घडली होती, तसेच सदाशिव पेठेतील हत्ती गणपती मंडळाजवळ मारामारीची घटना घडली हाेती. एकाला लोखंडी झाऱ्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. बेशिस्तपणे खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या लावण्यात आल्याने वाहतूक कोंडीही होते. गाड्याभोवती गर्दी होत असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन चालावे लागते. शहरातील बहुतांश रस्ते, चौकात खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी गाड्या लावल्या आहेत. पदपथावर खाद्यपदार्थाच्या गाड्या लावण्यात येतात. बेकायदा गाड्या लावणाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद होतात. वादातून हाणामारीच्या घटना घडतात. स्थानिक राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याने या गाड्यांवर कारवाई केली जात नाही. कारवाई केल्यानंतर पुन्हा तेथे व्यवसाय सुरू केले जातात.

Story img Loader