Pune Crime : गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेचे पडसाद पुण्यात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी या ठिकाणी पाहणी केली. तसंच स्वारगेट बस स्थानकाच्या आगारात रोज बलात्कार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकी घटना काय घडली?

पुण्यातून फलटणच्या दिशेने प्रवास करणाऱ्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडवर बलात्कार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथकं रवाना करण्यात आली आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?

काल पहाटे पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर एक अतिशय दुख:द, दुर्भाग्यपूर्ण घटना घडली. त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला ९.३० वाजता तक्रार मिळाली. पोलिसांचा तपास सुरु आहे. माझं सीपींशी बोलणं झालं आहे. त्यात संशयितदृष्ट्‍या फिरणारा आरोपी हा शिरुर तालुक्यातील आहे. आरोपी अजून सापडलेला नाही. पोलीस शिरुर आणि त्याच्या गावी तपास करत आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक

महाराष्ट्रात ही अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक आहेत, याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचे कारण नाही. पण आपण सर्व काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय, तरी या घटना घडत आहेत. सर्व सीसीटीव्हीची बारकाईने पाहणी करायला सांगितली आहे. तिथे सीसीटीव्हीत प्रवासीही दिसत आहेत. स्वारगेट आणि शिवाजीनगर या बस डेपोत ठिकाणी वर्दळ असते. काहीही करुन तो आरोपी सापडला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्या मुलीवर हा प्रसंग उद्भवला आहे त्या मुलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी करायची आहे ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने मलाही ती गोष्ट ऐकल्यानंतर अतिशय मनस्ताप झाला, असेही अजित पवार म्हणाले.

Story img Loader