पुणे : कोथरुड भागात संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना गुंड गजा मारणे टोळीतील सराइतांनी बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी गुंड गजा मारणेसह साथीदारांना अटक करण्यात आली. मारणेसह साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्ह्याचा तपास कोथरूड पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. याप्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडून करण्यात येणार असून, मारणेविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
याप्रकरणात मारणे याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी रात्री याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. कोथरूड भागात भेलकेनगर परिसरात बुधवारी (१९ फेब्रुवारी) शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी संगणक अभियंता देवेंद्र जोग दुचाकीवरून निघाले होते. मारणे आणि साथीदार कोथरूड भागातील एका चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी निघाले होते. मारणे मोटारीत होता. त्याच्यासोबत असलेले साथीदार मोटार आणि दुचाकीवरुन निघाले होते. भेलकेनगर चौकात दुचाकीस्वार जोग यांना मारणे टोळीतील गुंड ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५), किरण कोंडिबा पडवळ (वय ३१), अमोल विनायक तापकीर (वय ३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार यांनी मारहाण केली. पवार हा मारणेचा भाचा असून, तो पसार झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणे टोळीविरुद्ध कडक कारवाईचा इशारा दिल्यानंतर तो मंगळवारी सायंकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झाला. मारणेचा साथीदार रुपेश मारणेविरूद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी गुन्हे शाखेच्या पथकाकडून ७४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. मारणेने कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात केलेल्या घराचे बांधकामाची माहिती घेण्यात आली. मारणे याच्यासह साथीदारांच्या मालमत्तांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत असून , ते वापरत असलेल्या वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे. नागरिकांनी मारणे टोळीविरुद्ध तक्रार करावी. त्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे या कक्षाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेे आहे.