पुणे : कोथरुड भागात संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण करताना गुंड गजा मारणे, रुपेश मारणे यांनी साथीदारांनी चिथावणी दिली. ‘मस्ती आली आहे साल्याला, त्याला मारा’, अशी चिथावणी मारणेने साथीदारांना दिल्याची माहिती पाेलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. विशेष ‘मकोका’ न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी मारणेला तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोथरुड भागात १९ फेब्रुवारी रोजी दुचाकीस्वार संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त करुन आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे, साथीदार रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच मारणेचा भाचा श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार मारणेसह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली पोलीस आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर मारणे सोमवारी सायंकाळी कोथरुड पोलीस ठाण्यात हजर झाला. रुपेश मारणे आणि बाब्या पवार पसार झाले असून, गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. मारणेला मंगळवारी दुपारी विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात गुन्हे शाखेने हजर केले. मारणे हा सराइत गुन्हेगार असून, त्याने साथीदारांना तक्रारदार तरुणाला जिवे मारण्यासाठी चिथावणी दिली. त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेण्यात येत आहे. साथीदारांच्या ठावठिकाण्याबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्याच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे. आरोपी हा संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या आहे. मारणेसह साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असून, त्याची शहरात दहशत आहे. मारणे संघटित गुन्हेगारी करुन बेकायदा मालमत्ता उभी केली. यादृष्टीने तपास करायचा असल्याने मारणेला पोलीस कोठडी देण्याची विनंती विशेष सरकारी वकील विलास पठारे आणि गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी केली.

मारणेचे छायाचित्र प्रसारित; मानवाधिकारांचे उल्लंघन

आरोपी गजानन मारणे स्वतःहून कोथरूड पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला फरशीवर बसवून नकळत छायाचित्र काढण्यात आले, तसेच हे छायाचित्र प्रसारित करण्यात आले. मारणेला औषधोपचार नाकारले जातात. मारणेची अटक मूलभूत मानवधिकाराचे उल्लंघन आहे. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी तक्रार मारणेचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात केली, पोलिसांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यात गोवले आहे. किरकोळ मारहाणीच्या गुन्ह्यात जिवे मारण्याचा पयत्न, तसेच ‘मकोका’अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने चिथावणी दिल्याचा उल्लेख तक्रारदार तरुणाच्या जबाबात नाही. सीसीटीव्ही चित्रीकरणातह आरोपी दिसत नाही, असे ॲड. ठोंबरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune crime news gaja marne remanded in police custody till march 3 pune print news rbk 25 asj