आईकडे दारुसाठी पैसे मागूनही न दिल्याने पुण्यातील सिंहगड रोड परिसरात राहणार्‍या ३२ वर्षीय तरुणाने ६० वर्षीय आईचा खून केल्याची घटना घडली आहे. लोखंडी सळई आणि हातातील कड्याने मारहाण करून त्याने आईचा खून केला. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
विमल दत्तोपंथ कुलथे, वय ६०, रा. नर्हे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर आरोपी मुलगा सचिन कुलथे, वय ३२, याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्हे आंबेगाव येथील महालक्ष्मी अंगण येथे मयत विमल दत्तोपंथ कुलथे आणि आरोपी मुलगा सचिन हे दोघे राहत होते. मात्र आरोपी सचिन याला दारूचे खूप व्यसन असल्याने त्याची पत्नी वर्षभरापूर्वी सोडून गेली होती. तर वडिलोपार्जित जमीन विकून मिळालेल्या पैशातून घर चालत असे. सचिन हा कोणताही कामधंदा करीत नव्हता आणि दारूकरता तो आईकडे पैसे मागायचा. यावरून दोघांमध्ये अनेक वेळा भांडणं देखील झाली. सचिनच्या व्यसनाधीनतेमुळे नातेवाईक देखील त्यांच्या घरी जात नव्हते.

नेहमीप्रमाणे सचिनने घटस्थापनेच्या दिवशी दारूसाठी आईकडे पैसे मागितले. मात्र आईने त्याला पैसे दिले नाही. त्यावरून सचिनने लोखंडी सळई आणि हातातील कड्याने मारहाण केली. यामध्ये आई विमल या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती त्याने कोणालाही दिली नाही. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आरोपी सचिनने बहिणीला घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर आरोपी सचिन याला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिंहगड पोलिसांनी सांगितले.

Story img Loader