महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा होऊन अनेक वर्ष लोटली. मात्र, तरी देखील आजही अनेकजण अशा भूलथापांना बळी पडून आपलं सर्वस्व गमावून बसतात. यामध्ये सुशिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा समावेश असतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात समोर आली आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने एका भामट्याने शहरातील एका मोठ्या व्यावसायिकाला गंडा घातला आहे. आणि थोडेथोडके नसून या भामट्याने तब्बल ५२ लाख रुपये या व्यावसायिकाकडून लुबाडले आहेत. पुणे पोलिस यासंदर्भात तपास करत असून त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याचा दावा करणाऱ्या भामट्याला अटक केली आहे.

मी पैशांचा पाऊस पाडू शकतो…!

हा सगळा प्रकार घडला तो धायरीच्या गणेशनगर परिसरामध्ये. याच परिसरात वास्तव्यास असणाऱ्या या ४० वर्षीय व्यावसायिकाला लुबाडणाऱ्या भामट्याचं नाव आहे किसन पवार. ४१ वर्षीय किसन पवारने व्यावसायिकाला सातत्याने पैशांचा पाऊस पाडण्याचं आश्वासन दिलं. त्यासाठी अनेक प्रकारचे अघोरी विधी करण्याचा दावा केला,. हे विधी केल्यानंतर लागलीच आकाशातून पैशांचा पाऊस पडेल, असा ठाम विश्वास किसन पवारनं व्यावसायिकाला दिला. आपल्या अंधश्रद्धेपोटी व्यावसायिकाचा किसनवर विश्वास बसला आणि त्यानं किसनला पैसे देण्यास सुरुवात केली.

५२ लाख दिल्यानंतर आली जाग!

किसन वारंवार व्यावसायिकाकडे पैसे मागू लागला. प्रत्येक वेळी वेगवेगळे विधी करण्यासाठी हे पैसे लागत असल्याचं त्यानं सांगितलं. पैशांचा पाऊस पडल्यानंतर हे सर्व पैसे वसून होऊन आपण गर्भश्रीमंत होऊ, या अपेक्षेपोटी व्यावसायिकानं देखील मोकळा हात सोडून पैसे द्यायला सुरुवात केली. ही रक्कम तब्बल ५२ लाख १ हजार रुपयांच्या घरात गेली. शेवटी व्यावसायिकाचा धीर सुटला. मात्र, तरी देखील किसन शेवटचा एक विधी राहिला आहे, असं सांगायला लागला. हा सगळा प्रकार हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच व्यावसायिकानं सिंहगड पोलीस स्थानकात धाव घेतली.

किसन म्हणायचा, माझ्याकडे दैवी शक्ती आहेत!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन आपल्याकडे दैवी शक्ती असून त्याचाच वापर करून आपण पैशांचा पाऊस पाडू शकतो, असा दावा करत असे. पण शेवटी व्यावसायिकानं पैसे देणं बंद केलं. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांनी शोध सुरू कला. जालना पोलिसांच्या मदतीने किसनला अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला.

..आणि किसन अलगद सापळ्यात अडकला!

किसनचा कारनामा पुरेपूर ओळखलेल्या पुणे क्राईम ब्रांच पोलिसांनी जालना पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. किसन जालन्यामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडे एका व्यक्तीला अडचण असल्याचं सांगून पाठवण्यात आलं. या व्यक्तीकरवी किसनने व्यावसायिकाा देखील फसवल्याचं निश्चित झाल्यानंतर त्याला लागलीच अटक करण्यात आली.

पुणे : प्रियकरासोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर सामूहिक बलात्कार

कुणावरही विश्वास ठेऊ नका!

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी सामान्यांना आवाहन केलं आहे. “आम्ही लोकांना आवाहन करतो की अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कुणावरही विश्वास ठेऊ नका. अजून कुणाला किसननं फसवलं असेल, तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा”, अशी प्रतिक्रिया वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली आहे.

Story img Loader