Pune Crime News गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. ही घटना नेमकी कशी घडली हा सगळा घटनाक्रम उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील काय म्हणाल्या?

“पीडित मुलगी पुण्यात काम करते. ती सातारा या ठिकाणी तिच्या गावी चालली होती. सकाळी साधारण पावणेसहाच्या सुमारास ती बसची वाट बघत होती. त्यावेळी आरोपी तिकडे गेला होता. आरोपी तिच्याशी बोलला असंही दिसतं आहे आणि त्यानंतर तिच्या शेजारचा माणूस उठून निघून गेला हेदेखील दिसतं आहे. आरोपीने गोड बोलून तिच्याशी ओळख करुन घेतली आणि कुठे जाते आहेस असं विचारलं त्यावर मुलीने फलटणला जायचं आहे. तर त्याने तिला सांगितलं बस इथे नाही तर दुसऱ्या ठिकाणी लागते. चल मी तुला बसजवळ घेऊन जातो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी आरोपीसह बसजवळ जाताना दिसते आहे.” अशी माहिती स्मार्तना पाटील यांनी दिली.

बसमध्ये अंधार होता त्याचा फायदा घेऊनच आरोपीने दुष्कृत्य केलं-पाटील

स्मार्तना पाटील पुढे म्हणाल्या, “बसमध्ये अंधार होता, त्यावर ती आरोपीला म्हणाली की या बसमध्ये तर अंधार आहे. तर आरोपी तिला म्हणाला ही बस रात्री आली आहे. लोक झोपले असतील म्हणून अंधार आहे. तुला हवं तर तू चेक कर. तिला बसमध्ये जायला सांगितलं. सदर मुलगी अंधार का आहे हे बघायला आतमध्ये गेली. तेव्हा आरोपी तिच्या मागोमाग बसमध्ये शिरला त्याने बसचा दरवाजा लॉक केला आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी उतरुन गेल्याचंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं आहे. तसंच मुलगीही उतरली आणि बसने गावी जायला निघाली होती. या दरम्यान तिने हा प्रकार तिच्या मित्राला सांगितला. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिने हा सगळा प्रकार मित्राला सांगितला. मित्राने तिला सांगितल्यानंतर ती आमच्याकडे म्हणजेच पोलीस ठाण्यात आली. तिच्या तक्रारीनंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासलं.

आरोपी हा शिरुर गावातला आहे असं कळलं आहे. त्याची ओळख पटली आहे, त्याला शोधण्यासाठी आठ पथकं रवाना झाली आहेत. डॉग स्क्वॉडही शोध घेतो आहे.” असं स्मार्तना पाटील यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे?

“पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अनेक तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमधून मुली शिकायला पुण्यात येत असतात. तसं पाहिलं तर पुण्यात मुली कायम सुरक्षित राहिल्या आहेत. पुण्यात शिकायला येणाऱ्या मुलींना सुरक्षित वाटत असतं. पण स्वारगेट येथे घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आहे.”