Pune Crime : पुण्यातील वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील ६ वर्षांच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ४५ वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात असलेली आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्कूल व्हॅन दगडाने फोडली.
संजय रेड्डीला या प्रकरणी अटक
संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक ( Pune Crime ) करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत मुलगी एका शाळेत शिकत आहे. चार दिवसांपूर्वी मुलगी शाळेतून घरी आली. तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली. वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली. तेव्हा विद्यार्थी वाहतूक करणारे संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात, अशी माहिती तिने वडिलांना दिली.
वानवाडी पोलिसात तक्रार
या घटनेच्या दुसऱ्या दिवशी वडिलांनी मुलीला दुचाकीवरुन शाळेत सोडले. मुलीच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन पालकांना याबाबतची माहिती दिली. पालकांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा आरोपी संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. त्यानंतर वानवडी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक आयुक्त गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तातडीने तपास सुरू केला. या प्रकरणी आता राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हटलं आहे सुशीबेन शाह यांनी?
पुण्यातल्या चिमुकल्यांवर व्हॅन चालकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. मी बालहक्क आयोगाची अध्यक्ष म्हणून शाळा प्रशासन त्यांचं विभागीय मंडळ, विश्वस्त यांना सांगू इच्छिते की आम्ही गाइडलाइन दिल्या आहेत. त्याचं कठोर पालन झालंच पाहिजे. या प्रकरणात आम्हाला जर हे लक्षात आलं की विश्वस्तांनी, प्रशासनाने चालकाचं व्हेरिफिकेशन केलं नव्हतं तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करु. मुलांचं संरक्षण, त्यांची जबाबदारी शाळेचीही आहे. मुलं जोपर्यंत शाळेच्या गणवेशात आहेत किंवा शाळेसाठी एखाद्या उपक्रमात भाग घेत आहेत आणि त्यावेळी जर त्या विद्यार्थिनीला काही झालं तर ती जबाबदारी पूर्णपणे शाळेची आहे असं शाह यांनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd