पुणे : सराइतांकडून खंडणी विरोधी पथकाने चार पिस्तुलांसह आठ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक केली असून, आरोपींमध्ये तडीपार गुंडाचा समावेश आहे. नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी तडीपार गुंड अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २३, रा. बाकोरी फाटा,वाघोली), इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, रा. गोकुळ पार्क, बकोरी फाटा, वाघोली), गोपाळ संजय यादव (वय २४, रा. वाघोली), देवानंद शिवाजी चव्हाण (वय २३, रा. मारुती आळी शिरुर) यांना अटक करण्यात आली. तडीपार गुंड वाघोलीतील एका सोसायटीत साथीदारांसह राहत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गौरव देव आणि अनिल कुसाळकर यांना मिळाली. त्यांच्याकडे देशी बनावटीची पिस्तूले, काडतुसे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत चार पिस्तुलांसह आठ काडतुसे जप्त केली.
आरोपी गोपाळ यादव याच्याविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्न, अमन पटेल याच्याविरुद्ध अहिल्यानगर येथे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. इशाप्पा पंदी, देवानंद चव्हाण यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी पटेल याला तडीपार करण्यात आले आहे. आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक गौरव देव, सहायक फौजदार सुनील पवार, अनिल कुसाळकर, चेतन आपटे, आजिनाथ येडे, अमोल घावटे, अमोल राऊत, सैदोबा भोजराव, सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, दिलीप गोरे, पवन भाेसले, प्रशांत शिंदे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी ही कारवाई केली.