पुणे : येरवडा भागात पूर्ववैमनस्यातून सराइत गुन्हेगारावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पसार झालेल्या आराेपींना येरवडा पोलिसांनी अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर उर्फ बाळू चंद्रकांत गवस (वय २५,रा. जयप्रकाशनगर, येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य (वय ४४), स्वप्नील प्रवीण आचार्य (वय २४), रवीकिरण रामचंद्र आचार्य (वय ३५, तिघे रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांना अटक करण्यात आली. सुधीर गवस याचा आचार्य यांच्याशी वाद झाला होता. गवस याच्याविरुद्ध मारहाणीसह गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे येरवडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत. येरवडा कारागृहातून त्याची काही दिवसांपूर्वी जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. मंगळवारी रात्री गवसचा आचार्य कुटुंबीयांशी वाद झाला होता. त्यानंतर गवस पसार झाला होता.

हेही वाचा – महानायक अमिताभ बच्चन करणार वाचनाचा जागर… काय आहे उपक्रम?

हेही वाचा – पिंपरी : अजित पवारांना धक्का! शहराध्यक्ष गव्हाणे शरद पवार गटात

मध्यरात्री अडीचच्या सुमारास जयप्रकाशनगर परिसरात गवस थांबला होता. आरोपी प्रवीण, स्वप्नील, रवीकिरण यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आकाश मिनी मार्केटजवळ गवस लपला. आरोपींनी गवसला गाठून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गवसला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune criminal murder in yerawada due to enmity three arrested pune print news rbk 25 ssb