पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तिघांची ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार उंड्री भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती देऊन जाळ्यात ओढले. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी ३६ लाख ५२ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोंढवा भागातील आणखी एकाची १६ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेख तपास करत आहेत.
हेही वाचा : पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
सायबर चोरट्यांनी अशाच पद्धतीने खराडी भागातील एका तरुणाची ३४ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी नागरिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.