पुणे : सायकलच्या वापराला चालना देण्यासाठी आणि शहराची ओळख पुन्हा एकदा सायकलस्नेही शहर अशी करण्यासाठी मोठा गाजावाजा करत महापालिकेने एकात्मिक सायकल विकास आराखडा केला. मात्र, महापालिकेच्या निष्क्रिय भूमिकेमुळे सायकल मार्ग मरणासन्न अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

महापालिकेकडील आकडेवारीनुसार शहरात १०० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग असून, अस्तित्वातील सायकल मार्गांकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, त्यावर झालेली विविध प्रकारची अतिक्रमणे आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे सायकल मार्गांचा वापरच होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा – ससूनच्या प्रशासनाला उशिरा जाग! आता डॉक्टरांना आरोपींची तपासणी करण्याचे प्रशिक्षण मिळणार

शहरातील वाहतुकीचा विचार करून शहराचा एकात्मिक सायकल विकास आराखडा महापालिकने केला. तत्पूर्वी केंद्र सरकारच्या तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजनेअंतर्गत महापालिकेला विविध विकासकामे आणि योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यात सायकल मार्ग उभारण्यासाठी महापालिकेला २०० कोटींचा निधी मिळाला होता. त्यातून ११० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग उभारण्याचे नियोजित होते, तर एकात्मिक आराखड्यानुसार ४७० किलोमीटर लांबीचे मार्ग विकसनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने दहा वर्षांत किमान वीस मोहिमा राबविल्या. पण त्या केवळ कागदावरच राहिल्याने सायकल मार्गांची व्यथा कायम राहिली आहे.

शहरातील सायकलस्वारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात मार्ग विकसित करून देण्याची जबाबदारी महापालिकेची होती. मात्र सायकल मार्ग विकसित नसल्याने जेमतेम १० टक्के सायकलस्वारांकडून मार्गांचा वापर होत असून ९० टक्के सायकलस्वारांना भर रस्त्यातून सायकल चालवावी लागत आहे. महापालिकेकडील आकडेवारीनुसार शहरात १०० किलोमीटर लांबीचे सायकल मार्ग आहेत. मात्र ते चांगल्या स्थितीमध्ये नाहीत. अनेक मार्गांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यातही मार्गांमध्ये सलगता नाही. काही मार्ग जेमतेम पाचशे ते सातशे मीटर अंतराचे आहेत. त्यामुळे सायकलस्वारांकडूनही त्याचा वापर करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांनो सावधान! दररोज आठ हजार फुकट्यांवर कारवाईचा दंडुका; अडीच कोटी रुपये वसूल

सायकल मार्गांच्या नावाखाली उधळपट्टी

शहर सायकलस्नेही करण्यासाठी एकात्मिक आराखडा करण्यात आला. मात्र, त्याचा निधी सातत्याने वेगवेगळ्या कामांसाठी पळविण्यात आला होता. त्यामुळे या सायकल मार्गाची कामेही रखडली होती. त्यानंतर भाडेकरारावरील सायकल योजना राबविण्यात आली. ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही योजनाही गुंडाळली गेली.

ज्या रस्त्याची लांबी आणि रुंदी मोठी आहे, त्या ठिकाणीच सायकल मार्ग उभारता येणे शक्य होते. त्यामुळे अस्तित्वातील सायकल मार्गांची कामे केली जात आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र ती काढली जातील. केवळ सायकल मार्ग असले म्हणजेच सायकल वापराला प्रोत्साहन मिळेल, असे नाही. त्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, त्यावरील कार्यवाही सुरू झाली आहे.- निखिल मिझार, वाहतूक नियोजनकार, वाहतूक विभाग, पुणे महापालिका