पुणे : कर्वेनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या नृत्य शिक्षकाने या अत्याचाराचे चित्रीकरण केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी न्यायालयाने शिक्षकाला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी नृत्य शिक्षकाच्या विरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याच्या कलमांनुसार दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. या वेळी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील नितीन कोंघे आणि तपास अधिकारी सहायक निरीक्षक रणजित मोहिते यांनी न्यायालयाकडे केली.
हेही वाचा…पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती
आरोपी नृत्य शिक्षकाने बालकांवर लैंगिक अत्याचार करताना त्याचे चित्रीकरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे चित्रीकरण इतरांना पाठविण्याची धमकी त्याने दिली होती. त्यानुसार आरोपीने हे चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारित केले आहेत का, याबाबत तपास करायचा आहे, तसेच आरोपीने अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याबाबत चौकशी करायची आहे. त्याची सक्षमतेची चाचणी घ्यायची आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी ॲड. कोंघे यांनी केली. विशेष न्यायाधीश के. डी. शिरभाते यांच्या न्यायालयाने आरोपीला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.