पुणे : पुणे दौंड पुणे मार्गावरून धावणाऱ्या डेमू जुन्या झाल्या असून वारंवार बंद पडण्याच्या घटना होत आहेत. त्यामुळे दैनंदीन प्रवाशांना नियोजित ठिकाणी वेळेवर पोहचण्यास विलंब होत असल्याने मनस्ताप होत आहे. त्यामुळे पुणे-दौंड हे उपनगरीय क्षेत्र घोषित करून लोकल सेवा करावी अशी मागणी ग्रामीण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान, तातडीने सेवा सुरु करण्यात आली नाही, तर बुधवारपासून (५ मार्च) दौंड रेल्वे स्थानकावर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
दौंड आणि परिसरातून नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त दैनंदीन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विशेषतः रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. दौंड, पाटस, केडगांव, खुटबाव, यवत, उरुळी, लोणी, मांजरी, हडपसर हे पुण्याच्या अगदी जवळ या ठिकाणावरून उद्योग आणि कार्यालयांच्या ठिकाणी तसेच शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात. हडपसर-मगरपट्टा येथे असणारे माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्र, रुग्णालये, औद्योगिक कंपन्या, मांजरी येथे सिरम इन्स्टिट्यूट, लोणी येथे एमआयटी कॅम्पस, उरुळी येथील प्रयागधाम, यवत येथे गुळा उत्पादक कारखाने, कुरकुंभ औद्योगिक वसाहत, दौंड नगरपालिका आदी मोठमोठ्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या मार्गावर दैनंदीन प्रवास करणाऱ्यांसाठी ‘डेमू’ सुविधा आहे.
मात्र ही ‘डेमू’ व्यवस्थित चालत नसून अचानक निर्माण होणारे तांत्रिक बिघाड, लांब पल्ल्याच्या गाड्या आल्यावर अचानक बाजुला उभी करावी लागल्याने होणारा विलंब, वारंवार डेमू बंद पडण्याचे प्रकार सतत घडत आहे. त्यामुळे नोकरदारांना याचा मोठा फटका बसत असून व्यवसायांवरही परिणाम होत आहे. विशेषतः या मार्गावरून मोठ्या प्रमाणात दुधाची वाहतूक केली जाते. विलंब झाल्याने दुध उत्पादकांना फटका बसत असून त्यामुळे पुणे ते दौंड हे उपनगरीय क्षेत्र घोषित करून लोकल सेवा सुरु करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. अद्याप याबाबत कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे प्रवाशांकडून सांगण्यात आले.
७४ किमीसाठी अडीच तास
पुणे ते दौंड हे रेल्वे अंतर ७४ किलोमीटर आहे. पुणे आणि दौंड मार्गादरम्यान लोणी, उरुळी, केडगाव हे तीन थांबे असून सव्वा तासाचा कालावधी लागतो. मात्र, तांत्रिक बिघाड किंवा इतर रेल्वेमुळे डेमू थांबविण्यात येत असल्याने दीड ते दोन तासांचा विलंब होत असून नियोजित ठिकाणी जाण्यास अतिरिक्त वेळ लागत आहे. त्यामुळे उद्योग आस्थापनातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम होत आहे.
पुणे-दौंड मार्गावरील जुनी डेमू बंद करून लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही करण्याबाबत रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. पुढील पाच दिवसात कुठलीच कार्यवाही झाली नाही, तर दौंड स्थानकावर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सारिका भुजबळ, अध्यक्ष, पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी संघ.