पुणे : पुणे-दौंड मार्गावर रेल्वेची उपनगरी सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात असताना, पुणे विभागाने या मार्गावर मेमू गाडी सुरू केली आहे. या मार्गावरील डेमू गाडी मुंबईला दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याने भुसावळ विभागातून एक महिन्यासाठी मेमू गाडी मागवून या मार्गावर चालविली जात आहे. मेमूमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी ही तात्पुरती मलमपट्टी असल्याचे समोर आले आहे.
पुणे- दौंड मार्गावर दोन डिझेल मल्टिपल युनिट (डेमू) गाड्या सध्या धावतात. या गाड्यांच्या देखभालीचे काम दर दीड वर्षांनी करावे लागते. यासाठी डेमू गाडी मुंबईतील कार्यशाळेत एक महिना पाठवावी लागते. सध्या एक डेमू गाडी देखभाल व दुरुस्तीसाठी मुंबईला पाठविण्यात आली आहे. या मार्गावरील दोनपैकी एक गाडी कमी होणार असल्याने पुणे विभागाने आधीच भुसावळ विभागाकडून एक मेनलाइन मल्टिपल इलेक्ट्रिक युनिट (मेमू) गाडी मागवून घेतली. ही मेमू गाडी १२ डब्यांची असून, ती सध्या पुणे-दौंड मार्गावर धावत आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी हे पाऊल उचलल्याचा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
हेही वाचा : “ते लोक माझा खून…”, पुणे अपघातावरून रॅप करणाऱ्या आर्यनचा कारवाईनंतर आणखी एक व्हिडीओ व्हायरल
प्रत्यक्षात भुसावळ विभागाकडून केवळ एक महिन्यासाठी ही मेमू गाडी घेण्यात आली आहे. डेमू गाडी देखभाल व दुरुस्ती होऊन परत आल्यानंतर मेमू गाडी पुन्हा भुसावळ विभागाला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-दौंड मार्गावर मेमूची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. रेल्वेचे अधिकारी ही गाडी पुणे विभागाला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत आहेत. मात्र, भुसावळ विभाग ही गाडी पुणे विभागाला कायमस्वरूपी देण्यास तयार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लोकलचा प्रस्ताव धूळखात
दौंड जंक्शनचा पुणे विभागात समावेश करण्यात आला असला, तरी पुणे-दौंड लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी जूनपासून रेल्वे मंडळाकडे धूळखात पडून आहे. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने हा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर रेल्वे मंडळाकडून विचार सुरू असल्याचे समजते. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास या मार्गावर डिझेल मल्टिपल युनिटऐवजी (डेमू) इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (एमू) गाड्या धावणार आहेत. डेमू गाड्या या दहा डब्यांच्या असतात. त्याच वेळी एमू गाड्यांना प्रत्येकी चार डब्यांचे किमान तीन युनिट असतात. त्यामुळे या मार्गावर किमान १२ डब्यांच्या गाड्या धावू शकतील.
हेही वाचा : आरटीई प्रवेशासाठी काढावी लागणार सोडत; राज्यात उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्जांची नोंदणी
पुणे-दौंड मार्गावरील डेमू गाडी देखभालीसाठी मुंबईला पाठविण्यात आल्यानंतर या मार्गावर दर वेळी मेमू गाडी चालविली जाते. आताही तसाच प्रकार रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वेने पुणे-दौंड मार्गावर उपनगरी सेवा सुरू करावी, अशी आमची मागणी आहे.
दिलीप होळकर, रेल्वे प्रवासी ग्रुप (केडगाव)