पिंपरी : ‘देहूच्या पवित्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या भेटीला आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना तुकोबांचे मार्गदर्शन होते. आशीर्वाद होता. धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान हे राज्याच्या अधिष्ठानापेक्षा कायम मोठे असते,’ असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त देहू संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी शिंदे बोलत होते. देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजननाथ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे या वेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘देहूच्या भूमीवर ३७५ वर्षांत शेकडो वारकऱ्यांनी विठूनामाचा गजर केला. दिंड्या काढल्या. संत ज्ञानेश्वर महाराज श्वास, तर संत तुकाराम महाराज महाराष्ट्राचा प्रश्वास आहेत. तुकोबांची अभंगगाथा पाचवा वेद मानला जातो. तुकाराम महाराजांसाठी परमेश्वराने पुष्पक विमान पाठविले. या भूमीतून ते सदेह वैकुंठाला गेले. या दैवी घटनेला ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. तुकोबांच्या रचना आपल्या जगण्यावर भाष्य करतात. ३७५ वर्षांनंतरही कालबाह्य झालेल्या नाहीत. पुढील ३६५ वर्षच नव्हे तर ३,३७५ वर्ष या रंचनांमधील अर्थ लोप पावणार नाही. अभंग रूपाने तुकाराम महाराज आपल्यात आहेत. तुकोबांनी चारशे वर्षांपूर्वी क्लिष्ट असे तत्त्वज्ञान सोप्या मराठीत सांगितले. हाच मराठीचा अभिजात दर्जा होता.’

धर्माबरोबरच निसर्गाचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य

‘धर्माबरोबरच निसर्गाचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. नद्या रक्तवाहिन्या आहेत. संतांनी नद्यांच्या काठी आयुष्य घालवले. इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरीसह इतर तीर्थस्थळांवरून वाहणाऱ्या नद्यांची परिस्थिती बरी नाही. नदी प्रदूषण मुक्तीची लोकचळवळ झाली पाहिजे. नद्या आदर्श बनल्या पाहिजेत,’ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वारकरी, धारकरी, शेतकरी, लाडक्या बहिणी, भावांचा पुरस्कार

‘माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला देहू संस्थानने पुरस्कार दिला. पुरस्कारासाठी योग्य समजले, हे माझ्यासाठी फार भाग्याचे आहे. मनात आनंद, समाधान आहे. वारकरी संप्रदायाबद्दल पूर्वीही आदर होता. आज अधिक वृद्धिंगत झाला. हा पुरस्कार एकट्याचा नाही. माझ्यावर, माझ्या कामावर प्रेम करणाऱ्या, वारकरी, धारकरी, शेतकरी, लाडक्या बहिणी, लाडक्या भावांचा सर्वांचा पुरस्कार आहे. पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढली आहे,’ असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.