Pune Hospital Death Case Live Updates : पुण्यात एका गर्भवती महिलेचा रुग्णालयात उपचारांअभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली असून त्यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राजकीय पक्षांबरोबरच नागरिक संघटनादेखील आक्रमक झाल्या आहेत. एकीकडे राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असतानाच दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर असतानाही २० लाख रुपयांची मागणी रुग्णालयाकडून करण्यात आली होती. मृत महिलेचं नाव तनिशा भिसे असून त्या भाजपाचे विधान परिषद आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या.
Pune Deenanath Mangeshkar Hospital Death Case Live Updates : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स
Pune Deenanath Mangeshkar Hospital Live: भाजपा कार्यकर्त्यांकडून डॉ. सुश्रुत घैसास यांच्या भावाच्या घराची तोडफोड
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि तनिशा भिसे मृत्यू प्रकरण आता पुण्यात तापू लागले आहे. सर्व पक्षांनी आपापल्या पद्धतीने आंदोलन केल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मंगशेकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचे बंधू चिन्मय घैसास यांच्या घराची तोडफोड केली.
Deenanath Mangeshkar Hospital Death Case Live Updates: दीनानाथ रुग्णालयाने साधी दिलगिरी तरी व्यक्त केली का? भाजपा आमदार गोरखेंचा संताप
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिशा भिसे प्रकरणात त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कारण काहीही असले तरी रुग्णालयाने तनिशा भिसे यांच्या मृत्यूबाबत दिलगिरी किंवा दुःख व्यक्त करायला काय हरकत होती? असा सवाल भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
Pune Hospital Pregnant Women Death Case : तनिषा भिसेंना कॅन्सर होता हा दावा धादांत खोटा - अमित गोरखे, भाजपा आमदार
डॉ. घैसास आणि सुशांत भिसे यांचे सीडीआर तपासावेत. डॉ. केळकर व सुशांत भिसे यांचं बोलणं तपासावं. यातून खरा प्रकार लक्षात येईल. आता रुग्णालय त्यांची चुकीची बाजू खरी भासवण्याचा प्रयत्न करत आहे. तनिषा यांना कॅन्सर झाल्याचा दावा धादांत खोटा आहे - अमित गोरखे, भाजपा आमदार
Pune deenanath mangeshkar hospital live news updates : रुग्णालयाच्या चौकशी अहवालात काय?
१. ईश्वरी भिसे (रुग्णाचं नाव) या २०२० पासून रुग्णालयात उपचारासाठी येत होत्या.
२. २०२२ साली सदर महिलेवर चॅरिटीचा लाभ घेऊन ५० टक्के खर्च कपातीतून शस्त्रक्रिया झाली होती.
३. २०२३ साली सुखरूप प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.
४. रुग्ण महिलेनं आवश्यक एएनसी तपासणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात केलेली नाही
५. १५ मार्च रोजी रुग्ण महिला डॉ. घैसास यांना भेटल्या. प्रसूती जोखमीची असल्याचं त्यांनी रुग्णाला सांगितलं. दर ७ दिवसांनी तपासणी सांगितली. त्याप्रमाणे २२ मार्चला त्या येणं अपेक्षित होतं. पण त्या तपासणीसाठी आल्या नाहीत.
६. २८ मार्चला रुग्ण महिला रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात तपासणीसाठी आली. तेव्हा स्थिती सामान्य होती. पण जोखीम पाहता रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला.
पुढील उपचारांसाठी १० ते २० लाख रुपये खर्च येईल असं रूग्ण महिलेच्या नातेवाईकांना सांगितलं. तेव्हा त्यांनी भरती करून घ्या, पैशांचे प्रयत्न करतो असं सांगितलं.
डॉ. केळकरांनी त्यावर आहेत तेवढे पैसे भरा असं सांगितलं. पण नंतर रुग्ण न सांगताच रुग्णालयातून निघून गेल्याचं समजलं. पैशाची तजवीज न झाल्यास ससून रुग्णालयात जाण्याचा सल्ला डॉ. घैसास यांनी दिला होता.
२८ मार्चच्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले, याबद्दल डॉ. घैसास वा रुग्णालय प्रशासनाला काहीच माहिती नव्हती.
माध्यमातील माहितीनुसार, २८ मार्चला रुग्ण आधी दीनानाथमधून ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलला स्वत:च्या गाडीने गेली. तिथे भरती झाली व २९ मार्च रोजी सकाळी सिझेरियन प्रसूती झाली. सूर्या रुग्णालयातील माहितीनुसार आधीची शस्त्रक्रिया, कॅन्सर यासंदर्भातील माहिती तिच्या नातेवाईकांनी लपवून ठेवली.
उपचारांच्या खर्चाचे अॅडव्हान्स मागितल्याच्या रागातून ही तक्रार केलेली दिसते. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशाही त्यासाठी कारणीभूत असल्याचं समितीचं मत अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
Pune Hospital Death Case Live : धर्मादायच्या नावाखाली... - संजय शिरसाट
धर्मादायच्या नावाखाली महाराष्ट्रात अनेक मोठे रुग्णालय उघडले आहेत. नियम असा आहे की गरीब, दुर्बल घटकांसाठी १० टक्के बेड आरक्षित असायला हवेत. पण कोणत्याही रुग्णालयात बेड आरक्षित नसतात. उलट गरीबाला प्रवेशच नाही अशा पद्धतीने वागतात. आधी पैसे मग उपचार अशा मस्तवाल पद्धतीने काही रुग्णालयं काम करतात. ज्यांनी धर्मादायच्या नावाखाली नोंदणी केली आहे, अशा राज्यभरातील रुग्णालयांची चौकशी व्हायला हवी - संजय शिरसाट
Pune Hospital Pregnant Women Death Case : तुमच्यात हिंमत असेल तर... - संजय राऊत
हिंमत असेल तर ज्या डॉक्टरांची नावं भिसे कुटुंब घेतंय त्यांच्यावर कारवाई करावी. तुमची हिंमत फक्त विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याची आहे. ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, कावळाही तुमच्याकडे ढुंकून बघणार नाही. ज्या महिलेचा काल मृत्यू झाला, तिचे शाप लागतील तुम्हाला - संजय राऊत</p>
Pune deenanath mangeshkar hospital live news updates : आहेत तेवढे पैसे भरायला सांगितलं होतं - रुग्णालयाच्या चौकशी अहवालात दावा
घैसास डॉक्टरांनी तनिषा भिसेंना वेळोवेळी तपासलं होतं. जुळी मुलं असल्यामुळे अधिक काळजी घेणं आवश्यक होतं. पण तपासणीसाठी तनिषा भिसे येत नव्हत्या. दर सात दिवसांनी तपासणीसाठी येण्यास सांगितलं होतं. पण त्यासाठीही त्या आल्या नाहीत, असं या अहवालात म्हटलं आहे.
Pune Hospital Death Case Live : तनिषा भिसेंनी संगितल्यानुसार तपासण्या केल्या नाहीत - रुग्णालयाच्या चौकशी अहवालात दावा
तनिषा भिसेंना जुळी मुलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. काळजी घ्या असंही सांगितलं होतं. पण माहिती असूनही एएनसी तपासणीसाठी तनिषा रुग्णालयात आल्या नाहीत, असं अहवालात म्हटलं आहे. तनिषा भिसेंच्या नातेवाईकांना जेवढे पैसे आहेत ते भरा असं डॉ. केळकर यांनी सांगितलं होतं. पण तरीदेखील रुग्णालयाला न कळवता नातेवाईक तनिषा भिसेंना घेऊन गेले असं अहवाात नमूद करण्यात आलं आहे.
Pune Hospital Pregnant Women Death Case : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा चौकशी अहवाल
रुग्णालयानं चौकशीसाठी समिती गठित केली होती. त्या समितीचा अहवाल समोर आला आहे. त्यात वैद्यकीय संचालक धनंजय केळकर, अनुजा जोशी, समीर जोग आणि सचिन व्यवहारे या चौघांच्या समितीनं या प्रकरणाची चौकशी केली आहे. २०२० पासून तनिषा भिसे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी येत असल्याचं अहवालात म्हटलंय. २०२२ साली त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही झाली असून त्यात खर्चाच्या ५० टक्के रकमेची सूट देण्यात आली होती, असंही अहवालात म्हटलं आहे.
‘मन सुन्न करणारी घटना...’; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रतिक्रिया
तनिषा भिसे यांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गर्भवती असेलल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण पैशा अभावी वेळेत उपचार न देण्यात आले नाही आणि त्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ही घटना मन सुन्न करणारी असून चौकशी अहवाल समोर आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Deenanath Mangeshkar Hospital Death Case Live Updates: पैशाअभावी रुग्णालयाचा उपचारासाठी नकार, भाजपा आमदार अमित गोरखे काय म्हणाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने तनिशा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेवर आमदार गोरखे यांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
Deenanath Mangeshkar Hospital Death Case Live Updates: रुग्णाकडून दहा लाख रुपये मागितले का? दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अधिकारी म्हणाले...
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून गर्भवती महिला तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांकडून दहा लाख रुपये मागण्यात आले. पैशाविना उपचार न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी रवी पालेकर (जनसंपर्क अधिकारी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Pune deenanath mangeshkar hospital live news updates : विधानसभा उपाध्यक्षांनी दिला कारवाईचा इशारा
मी धर्मादाय आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काळात अशा घटना घडू नयेत म्हणून मी मुंबईला गेल्यावर धर्मादाय आयुक्त, पदाधिकारी, रुग्णालयाचे पदाधिकारी यांची एक संयुक्त बैठक घेणार आहे - विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
Pune Hospital Death Case Live : पोलिसांनी रूग्णालयातील सीसीटीव्ही फूटेज घेतलं ताब्यात...
या प्रकरणात आमची सर्व नागरिकांना विनंती आहे. चौकशी चालू आहे. अहवाल आल्यानंतर त्यावर पुढील कारवाई केली जाईल. रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आवाहन आहे की पोलीस विभाग त्यांचं काम करत आहे. पोलीस कर्मचारी आंदोलकांना बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम करत आहेत. सध्या पोलीस जबाब नोंद करून घेत आहेत. कागदपत्र गोळा करत आहेत. या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यावर पुढील कारवाई केली जाईल. त्या दिवसाचं सीसीटीव्ही फूटेजही आपण ताब्यात घेतलं आहे - डीसीपी संभाजी कदम
Pune deenanath mangeshkar hospital live news updates : दीनानात मंगेशकर रुग्णालयात नेमकं काय घडलं?
तनिशा भिसे यांना प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी कुटुंबिय घेऊन गेले.त्यावेळी तेथील डॉक्टरांनी तनिशा यांची तपासणी केली आणि जुळ्या मुली आहेत. तसेच शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. या शस्त्रक्रियेकरीता २० लाख रुपयांचा खर्च येईल आणि सुरुवातीला किमान १० लाख रुपये तरी भरावे लागतील, असे कुटुंबियांना डॉक्टरांनी सांगितले. त्यावर आमच्याकडे सध्या २ ते ३ लाख असून आम्ही इतर पैशांची जुळवाजुळव करू पण आपण उपचार करावे अशी विनंती केली. पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने उपचार करण्यास नकार दिला.
Pune Hospital Death Case Live : ठाकरे गटाकडून चिल्लर फेको आंदोलन!
आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने येत,रुग्णालय प्रशासनाने विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली.त्या आंदोलना दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडण्यास आले होते.त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिरीष याडकीकर यांच्या तोंडावर चिल्लर फेकल्याची घटना घडली.
Pune Hospital Death Case Live Updates : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला फासलं काळं
युवक काँग्रेसकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या फलकावर काळी शाई फेकून निषेध

Pune Hospital Death Case Live Updates : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार, आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन
पुण्यातील घटना मनाला सुन्न करणारी आहे. घटनेची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यातून येणाऱ्या अहवालानुसार संबंधित रुग्णालयावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. मंगेशकर रुग्णालयाची नोंदणी ट्रस्ट कायद्यांतर्गत केली आहे. शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ अशा रुग्णालयांना मिळत असतो. त्यामुळे अशी पैशांची मागणी संबंधित रुग्णालयाला करता येऊ शकते का? याचीही चौकशी होईल - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
Pune Hospital Pregnant Women Death Case : माध्यमांमध्ये आलेली माहिती अर्धवट - रुग्णालय प्रशासन
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली असताना त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मात्र, माध्यमांमध्ये या प्रकरणासंदर्भात आलेली माहिती अर्धवट असून आम्ही या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करू, अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी दिली आहे.
या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली आहे.(संग्रहित छायाचित्र)
Pune Deenanath Mangeshkar Hospital Death Case Live Updates : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची राज्य महिला आयोग व आरोग्य मंत्र्यांनीही गंभीर दखल घेतली आहे.