Deenanath Mangeshkar Hospital: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी १० लाखांची अनामत रक्कम मागितल्यानंतर सदर महिलेला शेवटच्या क्षणी दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर तनिशा भिसे या महिलेचा मृत्यू ओढवला होता. भाजपाचे आमदार अमित गोरखे यांनी हे प्रकरण समोर आणल्यानंतर दोन दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात टीकेची झोड उठत आहे. काल रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र आज (५ एप्रिल) एक सविस्तर निवेदन जाहीर करत रुग्णालयाने तनिशा भिसे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत मोठा निर्णय घेतला आहे.
घडलेली घटना दुर्दैवी – रुग्णालय
“घडलेल्या दुर्दैवी घटनेमागे आणि मृत्यू मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रती संवेदनशीलता दाखवली गेली की नाही, हे आम्ही तपासत आहोत”, असे रुग्णालयाकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यापुढे अनामत रक्कम घेणार नाही

वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही अनामत रक्कम (डिपॉझिट) या विषयाचा पुन्हा आढावा घेतला. यापुढे दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही रुग्णाकडून मग तो प्रसूती विभाग किंवा लहान मुलांच्या विभागात आलेला रुग्ण असेल, त्यांच्याकडून इमर्जन्सी अनामत रक्कम घेणार नाही, असा ठराव व्यवस्थापनाने केला आहे. आजपासूनच त्याची अंमलबजावणी होईल.

Dr. Dhananjay Kelkar Letter_page-0001
दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांचे निवेदन

तनिशा भिसे यांच्या मृत्यूनंतर भाजपा आमदार अमित गोरखे यांनी एका व्हिडीओद्वारे सदर प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीका केली होती. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी संताप व्यक्त होत होता. त्यातच शुक्रवारी (४ एप्रिल) पुण्यातील अनेक पक्षांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले.

Dr. Dhananjay Kelkar Letter_page-0002
दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाने यापुढे अनामत रक्कम न घेण्याचा निर्णय केला जाहीर.

आमची मान शरमेने खाली…

या आंदोलनाचा उल्लेख करताना निवेदनात म्हटले की, कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने आमच्या जनसंपर्क अधिकाऱ्याच्या अंगावर चिल्लर फेकली. महिला कार्यकर्त्यांनी डॉ. घैसास यांच्या आई-वडिलांच्या रुग्णालयावर हल्ला करत तोडफोड केली. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळे फासले. या सर्व गोष्टी टीव्ही कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे बघून आमची मान शरमेने खाली गेली.