पुणे : डेंग्यूच्या उद्रेकाचा अचूक अंदाज दोन महिने आधीच वर्तवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. संभाव्य साथ रोखण्यास याचा उपयोग होणार आहे.
पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल आणि सोफिया याकॉब यांच्या नेतृत्वाखाली डेंग्यूचे पैलू, अंदाज आणि भारतातील बदलत्या पर्जन्यमानानुसार होणारी वाढ या विषयीचे संशोधन करण्यात आले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुणे : रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड, साडेदहा लाखांच्या तांब्याच्या तारा जप्त
‘सुमारे २७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, मध्यम आणि समतोल पाऊस, तसेच पावसाळ्याच्या (जून-सप्टेंबर) कालावधीत ६० ते ७८ टक्क्यांदरम्यान असणारी सापेक्ष आर्द्रता हे घटक डेंग्यूच्या प्रसारात आणि मृत्युदरात वाढीस कारणीभूत ठरतात. याउलट, आठवड्याला १५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या अंडी आणि अळ्या नष्ट होऊन डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होतो,’ असे संशोधनात दिसून आले.
या संशोधनात ‘आयआयटीएम’मधील पाणिनी दासगुप्ता, रजिब चटोपाध्याय, अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँडमधील रघु मुर्तुगड्डे, आमीर सापकोटा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आनंद करिपोट, महाराष्ट्र सरकारमधील सुजाता सौनिक, कल्पना बळीवंत, युनायटेड किंग्डममधील युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅममधील रेवती फाळके, राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळातील अभियांत तिवारी यांचाही सहभाग होता.
‘इतर आजारांसाठीही प्रणाली शक्य’
‘डेंग्यूसाठी विकसित केलेल्या प्रणालीच्या धर्तीवर चिकुनगुनिया, मलेरिया, कॉलरा अशा आजारांसाठी स्वतंत्रपणे प्रणाली विकसित करणे शक्य आहे. संपूर्ण देशाचा हवामानाचा विदा उपलब्ध आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य विभागाने आजारांचा विदा उपलब्ध करून दिल्यास आरोग्य विदा आणि हवामानाचा विदा यांचा वापर करून स्वतंत्र संशोधनाद्वारे अन्य आजारांसाठीही प्रणाली विकसित करता येऊ शकते,’ असे डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितले.
हेही वाचा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे
महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत पुण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीचा वापर केल्यास दोन महिने आधीच डेंग्यूच्या उद्रेकाची माहिती मिळू शकते. त्यामुळे उद्रेक रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे शक्य आहे. तसेच या आजाराचे दुष्परिणाम कमी करता येऊ शकतात, असे आयआयटीएमचे
शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी सांगितले.
पुण्यात डेंग्यूमृत्यूंची संख्या वाढण्याचा अंदाज
वाढते तापमान आणि बदलत्या पर्जन्यमानामुळे पुण्यात २०३० पर्यंत डेंग्यूमुळे होणारे मृत्यू १३ टक्क्यांनी, तर २०५०पर्यंत २३ ते ४० टक्क्यांनी वाढण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. डासांद्वारे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते हवामान बदलामुळे वाढत आहे. यात भारताचा वाटा एकतृतीयांश आहे. त्यामुळे संशोधनामध्येही डेंग्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या पुणे शहरातील तापमान, पर्जन्यमान आणि आर्द्रता यांचा डेंग्यूवरील प्रभाव याचा सखोल अभ्यास करण्यात आला.