पिंपरी : हिंजवडीतील माहिती व तंत्रज्ञानगरीतील उद्याेग राज्याबाहेर गेल्याचा खाेटा प्रचार खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून केला जाताे. हे उद्याेग राज्याबाहेर गेले नसून १६ उद्योगांनी राज्याच्या विविध भागात विस्तार केला आहे. त्यापैकी १३ उद्याेग महाविकास आघाडी सरकार असताना आणि महायुती सरकारच्या काळात तीन उद्याेग जिल्ह्याबाहेर गेले आहेत. पुणे जिल्ह्यातील उद्याेगांसाठी शरद पवार ५० वर्षात पायाभूत सुविधा का निर्माण करू शकले नाहीत? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच खाेट्या कथानकाचे जनकही शरद पवार असल्याचा आराेपही त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचवडचे भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची कस्पटे वस्ती, काळेवाडी फाटा येथे बुधवारी सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, अमित गोरखे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : अजित पवारांच्या जाहिरनाम्याची अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली; म्हणाले, “आम्ही तुम्हाला चंद्र…”

फडणवीस म्हणाले, जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून खाेटे कथानक पसरविले जात आहे. महाराष्ट्रात उद्याेग येत नसल्याचा खाेटा प्रचार केला जात आहे. परंतु, देशातील सर्वाधिक ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये अँटाे माेबाइलचे उद्याेग सुरू झाले आहेत. यातून राज्यातील तरूणांच्या हाताला काम मिळेल. याचे गुणगान करणे गरजेचे असताना खाेटा प्रचार केला जात आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी मेट्राेचे जाळे विस्तारत आहाेत. वर्तुळाकार मार्गाचे काम सुरू आहे. वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी ५४ हजार काेटी रूपयांची कामे केली जात आहेत. त्यामुळे लवकरच वाहतूक काेंडी सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे, टँकर लॉबी आणि कोंडी…!

देशातील वेगाने वाढणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे. नागरिकरण माेठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या लाेकसंख्येला पाणी कमी पडू दिले जाणार नाही. वेगवेगळ्या धरणातून शहरासाठी पाणी उपलब्ध केले जाईल. पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी युती धर्माचे पालन केले जाईल, जीवाचे रान करून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणले जातील, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune devendra fadnavis said industries left hinjawadi it park during mahavikas aghadi government tenure pune print news ggy 03 css