पुणे : धनकवडी भागात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. सनी रमेश आठवले (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत कुंदन बाबुराव आठवले (वय ५२, रा. ओगलेवाडी, जि. सातारा) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी आठवले हा वर्षभरापासून एका महिलेसोबत राहत होता. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती त्याने नातेवाईक कुंदन आठवले यांना दिली होती. महिलेचे नातेवाईकही त्याला धमकी देत होते. बुधवारी मध्यरात्री सनी याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुंदन यांना मिळाली. त्यांनी सनीच्या मित्रांकडे चौकशी केली. त्यानंतर ते पुण्यात आले. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. सनी याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुंदन यांनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार तपास करत आहेत.