पुणे : सेवा विकास बँकेतील कोट्यवधी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) रोझरी एज्युकेशन ग्रुपचा संचालक विनय अरहाना याच्यासह ॲड. सागर सूर्यवंशीला अटक केली. सीआयडीच्या पथकाने कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली अमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दोघांना ताब्यात घेतले. दोघांना मध्यरात्री शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले .
अरहानाला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. सेवा विकास बँकेतील कर्ज गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. अरहानाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल करुन गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायलयाने गुन्हे रद्द करुन त्याला दिलासा दिला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालायत सुनावणी झाल्यानंतर सीआयडीला तपासाबाबत परवानगी देण्यात आली होती. सीआयडीच्या पथकाने अरहाना आणि ॲड. सूर्यवंशीची चौकशी करुन त्यांना अटक केली.
हेही वाचा – उमेदवारीसाठी वसंत मोरेंची वणवण
सेवा विकास बँकेची मुख्य शाखा पिंपरी येथे आहे. बँकेच्या एकूण २५ शाखांमध्ये एक लाख खातेदार आहेत. २०१० आणि २०२० या कालवधीत सेवा विकास बँकेतील गैव्यवहाराबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. जून २०२१ मध्ये रिझर्व्ह बँकेने गंभीर दखल घेतली. गैरव्यवहार प्रकरणात बँकेच्या संचालकांना अटक करण्यात आली होती. बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. लेखापरीक्षकामार्फत रिझर्व्ह बँकेकडे अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती. चौकशीत बँकेत ४२९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले होते. ईडीने याप्रकरणात बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह अन्य आरोपींची चौकशी केली होती. त्यांना याप्रकरणात अटक करण्यात आली होती. विनय अरहाना आजारपणाच्या बहाण्याने येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तेथे अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलशी त्याची ओळख झाली. ललितला ससूनमधून पसार होण्यासाठी त्याने मदत केल्याचे उघड झाले होते.
सिद्धू मुसेवाला प्रकरणानंतर मध्यरात्री सुनावणी
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील आरोपींना पुणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. मुसेवाला खून प्रकरणातील आरोपींना मध्यरात्री शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर सेवा विकास बँकेतील गैरव्यवहार प्रकरणात गुरुवारी मध्यरात्री विनय अरहानासह दोघांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.