पुणे शहरात आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. सद्यस्थितीला चारही धरणात मिळून २०.०४ टीएमसी आणि ६८.७३ टक्के इतका पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ११ हजार ७०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चार ही धरणात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठयामध्ये कमालीची वाढ झाली असून आज पाच वाजेपर्यंत चार ही धरणात मिळून २०.०४ टीएमसी आणि ६८.७३ टक्के इतका पाणी साठा जमा झाला आहे. तर यांपैकी खडकवासला धरण हे कालच १०० टक्के भरलं आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून काल दुपारपासून ४२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली होती. तोच विसर्ग सद्यस्थितीला ११ हजार ७०४ वर जाऊन पोहोचला आहे.

धरण क्षेत्रात अद्यापही संततधार सुरू आहे. यामुळे आणखी काही तासात पाणी साठ्यात वाढ होऊ शकते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

चारही धरणांतील पाणीसाठा आणि टक्केवारी

  1. खडकवासला – १.९७ (टीएमसी), १०० टक्के
  2. पानशेत – ८.१५ (टीएमसी), ७६.५८ टक्के
  3. वरसगाव – ८.०७ (टीएमसी), ६२.९७ टक्के
  4. टेमघर – १.८४ (टीएमसी), ४९.५० टक्के

सध्याचा एकूण पाणीसाठा

२०.०४ टीएमसी ६८.७३ टक्के

मागील वर्षी धरणातील पाणीसाठा

२९.१५ टीएमसी, 100 टक्के

Story img Loader