पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) प्रारूप मतदारयादी जाहीर केली. त्यानुसार शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन, तर ग्रामीण भागातील दहा अशा एकूण २१ विधानसभा मतदार संघांमधील मतदारांची संख्या ८० लाख ७३ हजार १८३ झाली आहे. चालू वर्षी ५ जानेवारीला जाहीर करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीपेक्षा मतदारांच्या संख्येत एक लाख २१ हजार ७६३ ने वाढ झाली आहे. या यादीवर नागरिकांना ९ डिसेंबरपर्यंत दावे, हरकती दाखल करता येणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १ जानेवारी २०२४ पर्यंत किंवा त्या आधी १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची मतदार नोंदणी करण्यात येत आहे. प्रारूप यादीवरील दावे, हरकती निकाली काढल्यानंतर ५ जानेवारी २०२४ रोजी शहरासह जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीत नाव असणाऱ्या नागरिकांनाच लोकसभेला मतदार करता येणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या ७९ हजार ३६२ एवढी होती. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही टक्केवारी ०.६७ टक्के होती.
हेही वाचा : ससूनमधील दोषी कोण? चौकशी समितीकडून अखेर अहवाल सादर
यंदा या वयोगटातील मतदारांची संख्या तीन लाख ७१ हजार तीन एवढी झाली आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ती ३.१३ टक्के आहे, तर २०- २९ या वयोगटातील मतदारांची संख्या १३ लाख ६३ हजार ६२४ वरून २८ लाख २७ हजार ३७६ एवढी झाली आहे. या वयोगटातील मतदारांच्या टक्केवारी ११.५१ वरून २३.८६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे युवक मतदारांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे निरीक्षण उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी नोंदविले.
हेही वाचा : ज्येष्ठाला मोहजालात अडकवून ३० लाखांची खंडणी उकळणारी महिला अटकेत
प्रारूप यादी कुठे पाहाल?
प्रारूप मतदार यादी नागरिकांना पाहण्यासाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in आणि ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर यांनी सांगितले.
मतदारयादीचा आढावा
२१ विधानसभा मतदार संघातील मतदार संख्या ७९ लाख ५१ हजार ४२०
प्रारूप यादीतील मतदार संख्या ८० लाख ७३ हजार १८३
पुरुष मतदारांची संख्या ४२ लाख २५ हजार ९१८
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुरुष मतदारांमध्ये ५९ हजार ६५३ ने वाढ
महिला मतदारांची संख्या ३८ लाख ४६ हजार ७४१
तृतीयपंथी मतदारांची संख्या ४९५ वरून ५२४