पुणे : जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक कामकाजासाठी तब्बल ७१ हजार कर्मचारी आवश्यक आहेत. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सोमवारी (१५ एप्रिल) पार पडले. या प्रशिक्षणाला एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे पाच हजार कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे या गैरहजर कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केली.
हेही वाचा : ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
निवडणूक कामकाजाच्या आढाव्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्हा आकाराने मोठा आहे. जिल्ह्यात लोकसभेचे चार मतदारसंघ असून ८३८२ मतदान केंद्रे आहेत. परिणामी निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागत आहे. निवडणूक कामकाजासाठी ७१ हजार अधिकारी, कर्मचारी आवश्यक आहेत. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण सोमवारी पार पडले. या प्रशिक्षणाला सुमारे दहा टक्के कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. काही कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे दोन आदेश मिळाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतची शहानिशा करून उर्वरित गैरहजार कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्यात येणार आहे. काही शासकीय खात्यांमध्ये ४० टक्के महिला कर्मचारी आहेत. महिलांना त्यांच्या मतदारसंघात निवडणूक कामकाज देण्यात येईल. तसेच एका महिलेसोबत दुसरी महिला कर्मचारी जोडीला देण्यात येईल.’