पुणे : उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी करणारे मत्सव्यवसायिक, जलाशयालगत संपादित क्षेत्रात अनधिकृतपणे बंदी घालण्यात आलेल्या मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करावी. गुन्हे दाखल करावेत. मासेमारी करण्यासाठी परवाना बंधनकारक आहे, असे कठोर निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सोमवारी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील दौंड आणि इंदापूर, सोलापूरमधील माढा, करमाळा, तर नगर जिल्ह्यातील कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यातील परवानाधारक आणि विनापरवाना मत्स्यव्यावसायिक अनधिकृतपणे लहान मासळी मासेमारी करत असल्याचे आढळून आले आहे. त्याला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा, पोलीस, महसूल, मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले.

हेही वाचा… ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहातील डॉक्टर गजाआड

लहान मासळी मासेमारी, मांगूरपालन करु नये, लहान मासळी मासेमारीकरीता वापरण्यात येणारी जाळी व साहित्य त्वरीत नष्ट करावे. प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांनी त्यांच्याकडील मांगूर मासा साठा नष्ट करावा. उजनी जलाशय संपादित क्षेत्रात असणारी शेततळी नष्ट करावीत. संपादित क्षेत्रात अशा प्रकारचे कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा… राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्याचा राजीनामा; जाणून घ्या कारण

मासेमारी करण्यासाठी परवाना बंधनकारक आहे. स्थानिक मत्स्यव्यवसायिकांनी उजनी जलाशयात मासेमारीसाठी आवश्यक परवाना नजीकच्या जलसंपदा विभाग शाखा कार्यालयाशी संपर्क साधून घ्यावा. परवाना नसलेल्या मत्स्यव्यवसायिकांवर विनापरवाना जलाशयात प्रवेश केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असे उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune district collector took tough decision regarding fishing in ujani dam pune print news psg 17 asj