लम्पी त्वचा रोग बाधित पशूंना ऑनलाइन उपचाराची (टेलिमेडिसीन) सोय पुणे जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. बुधवारी (७ डिसेंबर) लम्पी आजाराने गंभीर असलेल्या २८ जनावरांवर ऑनलाइन पद्धतीने उपचार करण्यात आले.
हेही वाचा >>>पिंपरीः चिंचवड गोळीबार प्रकरणात तीन आरोपी अटकेत
या बाबत माहिती देताना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, पुणे जिल्ह्याच्या काही भागात लम्पीबाधित जनावरे आढळून येत आहेत. जिल्ह्यात लम्पी त्वचा रोग सक्रिय असलेल्या पशूंची संख्या ६०० आहे; पण लसीकरण मोहीम आणि पशुसंवर्धन विभागाच्या उपचारामुळे त्यांना सौम्य लक्षणे आहेत. जिल्ह्यात २५ फिरती पथके पशूंवर उपचार करीत आहेत. त्यासाठी शिरवळ येथील सरकारी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांची मदत होत आहे.
हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या बंद ;आंदोलनात छत्रपती संभाजीराजेचा सहभाग
जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी लम्पीबाधित पशूंवर ऑनलाइन उपचार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. लम्पीबाधित संशयित २८ पशू आढळल्यानंतर पशुवैद्यकांचे पथक घटनास्थळी गेले. त्याच वेळी पुणे जिल्हा परिषदेत तज्ज्ञ पशुवैद्यक बसले होते. घटनास्थळी गेलेल्या पशूवैद्यकांनी दृकश्राव्य संवादाद्वारे बाधित जनावराची माहिती पुण्यात बसलेल्या तज्ज्ञांना सांगितली. तज्ज्ञांनी दृकश्राव्य संवादाद्वारे तेथील पशुवैद्यक आणि पशुपालकांकडून लम्पी रोगाची तीव्रता, लक्षणे, अगोदर झालेले उपचार आदींची माहिती घेतली. त्यानंतर पुढील उपचारा बाबत मार्गदर्शन केले.
हेही वाचा >>>पिंपरी पोलिसांचा दरारा! तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना काही तासांतच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ऑनलाइन उपचाराद्वारे तज्ज्ञांचा सल्ला मिळणार
लम्पीबाधित पशूंसाठी उपचार पद्धती विकसित करणारे आणि संशोधनात्मक काम करणाऱ्या तज्ज्ञ पशुवैद्यकांची संख्या कमी असल्यामुळे तज्ज्ञ पशुवैद्यकांना ग्रामीण भागात, प्रत्यक्ष पशुपालकांच्या गोट्यावर जाऊन उपचार करणे शक्य होत नाही. कमी वेळेत जास्तीत-जास्त बाधित पशूंना उपचार मिळावेत. गंभीर आजारी असलेल्या पशूंना अचूक सल्ला मिळवा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे लम्पीबाधित पशूंवर ऑनलाइन उपचारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लम्पी बाधित जनावरांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांचा मृत्यू रोखण्यासाठी हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवणार आहोत, असेही आयुष प्रसाद म्हणाले.