पुणे : पुणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात १३ हजार २१ घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत घरांची विक्री दुपटीने वाढली आहे. याच वेळी घरांचे एकूण व्यवहार १० हजार ६१३ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांची विक्रीही दुपटीने वाढली आहे.
पुणे जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केला आहे. यानुसार मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सहा हजार ५४४ घरांची विक्री झाली होती. यंदा ऑगस्टमध्ये ही संख्या दुपटीने वाढून १३ हजार २१ वर पोहोचली आहे. याचबरोबर मुद्रांक शुल्कात मागील वर्षीच्या तुलनेत ८२ टक्क्यांनी वाढ होऊन ते ४२३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ऑगस्टमध्ये अडीच कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या १३० घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ही संख्या ६५ होती.
हेही वाचा : अजित पवारांनी शरद पवारांसोबत व्यासपीठावर येणे टाळले?
या वर्षभरात ऑगस्टपर्यंत एकूण ९१ हजार २३ घरांची विक्री झाली आहे. मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत विक्रीत यंदा किरकोळ एक टक्का वाढ नोंदविण्यात आली आहे. याच वेळी मुद्रांक शुल्क महसुलात ६.६ टक्क्यांनी वाढ होऊन तो तीन हजार २२६ कोटी रुपयांवर गेला आहे. तसेच, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण व्यवहारामध्ये २५ टक्के वाढ होऊन ते ६९ हजार १५ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : गणेशोत्सवात तीन दिवस मद्यविक्री बंद
परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक मागणी
ऑगस्टमध्ये परवडणाऱ्या घरांची (२५ ते ५० लाख रुपये किंमत) सर्वाधिक विक्री झाली आहे. घरांच्या एकूण विक्रीत परवडणाऱ्या घरांचा वाटा ३४ टक्के आहे. याच वेळी ५० लाख ते १ कोटी रुपयांदरम्यानच्या घरांचा वाटा ३२ टक्के आहे. एक कोटी रुपयांवरील किमतीच्या घरांच्या विक्रीतही वाढ होत आहे. एकूण विक्रीतील त्यांचे प्रमाण ११ टक्क्यांवर पोहोचले आहे.
हेही वाचा : “शिंदे- फडणवीस सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून…” सचिन अहिर यांचं वक्तव्य चर्चेत
‘पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेत तेजी दिसून येत आहे. ग्राहकांची परवडणाऱ्या घरांना सर्वाधिक मागणी आहे. याच वेळी मोठ्या आकाराच्या घरांनाही मागणी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे आर्थिक उलाढाल वाढली असून, घरांची बाजारपेठही वाढत आहे’, असे नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी म्हटले आहे.