पुणे : बनावट अध्यादेश काढून पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध माध्यमिक शाळांमधील ५० अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी डाॅ. दीपक चांदणे यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पोलीस निरीक्षक अमाेल भोसले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिक्षण विभागाचे सचिव प्रविण मुंढे यांच्या नावाचा बनावट अध्यादेश काढण्यात आला. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. या प्रकरणामध्ये डॉ. चांदणे याच्याबरोबरच अनेक जण सामील असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून डाॅ. चांदणे यांनी शिक्षकांकडून १७ लाख रुपये गोळा केल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे.

हा प्रकार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात १९ ऑक्टोबर २०२४ ते २७ डिसेंबर २०२४ दरम्यान घडला. त्याबाबत तक्रार मिळाल्यानंतर ‘एसीबी‘ने तपास केला. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.“एसीबी‘तील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमिक शाळांमधील ‘एटीडी’ पदविका मिळवलेल्या अपदवीधर कला शिक्षकांनी ‘एएम’ ही पदवी मिळवल्यानंतर वरिष्ठ पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला होता. डॉ. दीपक चांदणे यांनी आपली शिक्षण विभागामध्ये ओळख असल्याचे भासविले. त्यांनी शासनाकडून आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूने अन्य आरोपींच्या मदतीने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचे अतिरिक्त सचिव प्रविण मुंढे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करुन बनावट शासन निर्णय तयार केला. या बनावट शासन निर्णयाचा संदर्भ टाकून शिक्षणाधिकारी यांच्या बनावट सह्यांचा बनावट आदेश तयार केला. त्यासाठी डॉ. दीपक चांदणे याने शिक्षकांकडून एकूण १७ लाख रुपये गोळा केले.

बनावट शासन निर्णय समाज माध्यमात प्रसारित झाला. शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्याची छाननी करण्यात आल्यानंतर संबंधित शासन निर्णय राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कोठेही आढळून आलेला नाही. अतिरिक्त सचिव प्रविण मुंढे यांच्या बनावट स्वाक्षरीने हा खोटा आदेश काढण्यात आल्याची बाबही समोर आली. त्यानंतर डाॅ. भाऊसाहेब कारेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या महिन्यात तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या शिक्षकांशी, मुख्याध्यापकांकडे चौकशी केली. त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader