heavy rainfall in lonavla : पुणे : पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. लोणावळ्यात आज दिवसभर जोरदार पाऊस झाला. भुशी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असल्याचं पाहायला मिळालं. भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसाचा आनंद घेण्याची इच्छा आज पर्यटकांची अपूर्ण राहिली. कारण, मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात वाढला होता. भुशी धरणाच्या पायऱ्यांवर उतरणे अशक्य होतं.

दुसरीकडे आई एकविराच्या कार्ला गडाला धबधब्याचे स्वरूप आलं होतं. पायऱ्यांवरून ओसंडून पाणी वाहत असल्याचं पहायला मिळालं. यामुळे भाविकांना मंदिरात जाणं अवघड झालं. पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट दिल्यानंतर जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. मावळ, लोणावळा, पिंपरी- चिंचवड शहरात रात्री पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. लोणावळ्यातील निसर्गाच सौंदर्य बघण्यासाठी अनेक जण लोणावळ्यात येत आहेत.

हेही वाचा…सामिष खवय्यांकडून ‘गटारी’ साजरी; हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव

आज रविवार असल्याने टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट आणि भुशी धरण येथे पर्यटकांनी गर्दी केली होती. लोणावळ्यातील कार्ला गडावर आई एकविरा च्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांची चांगली तारांबळ उडाली. अति मुसळधार पाऊस झाल्याने गडाला धबधब्याचे स्वरूप आलं होतं. पावसाचे पाणी थेट पायऱ्यांवरून खाली आलं. गडाच्या विविध ठिकाणाहून पाणी येत असल्याने पायऱ्यांवर देखील धबधब्याप्रमाणे जोरात पाणी वाहत होतं. अशा पाण्यातून नागरिकांना आणि भाविकांना वाट काढत खाली यावं लागलं. पुण्याच्या मावळमधील पवना धरणातून ८ हजार ९६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, यामुळं पवना नदीवरील पवनानगर- कोथुर्णे पूल पाण्याखाली गेल्याने पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला आहे.