पुणे: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या ( डीपीडीसी) बैठकीत शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला गुंड उपस्थित राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी कारवाई करुन गुंडाला ताब्यात घेतले.
हेही वाचा >>>गावी निघालेल्या विद्यार्थ्याची थकीत दंडाच्या नावाखाली अडवणूक ; स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाचे आंदोलन
दरम्यान, तडीपार गुंड बैठकीस उपस्थित कसा राहिला, याचा तपास करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. प्रदीप बाजीराव जगताप (वय ६०, रा. सासवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जगताप सराईत गुंड असून त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. विधान भवनात सोमवारी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, प्रकाश जावडेकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. जगतापने तडीपारीची कारवाई रद्द करण्यासाठी प्रांतधिकाऱ्यांकडे अपील केले होते. प्रशासनाने त्याचे अपील फेटाळले होते.
जगताप पुण्यात असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना मिळाली होती. सासवड पोलिसांचे पथक जगतापच्या मागावर होते. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जगताप उपस्थित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांना मिळाली. बैठक सुरू असताना डॉ. देशमुख यांनी सासवड पोलिसांच्या पथकाला ही माहिती दिली. बैठकीत उपस्थित असलेली संशयित व्यक्ती जगताप असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. जगताप बैठकीस कसा उपस्थित राहिला, याची चौकशी करण्याचे आदेश डॉ. देशमुख यांनी सासवड पोलिसांना दिले आहेत.