पुणे : करोना संसर्गाची जानेवारी २०२२ मध्ये आलेली तिसरी लाट ओसरल्यानंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात १०९१ नवीन रुग्णांना करोना संसर्गाचे निदान झाले आहे. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली आहे. पुणे शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे.
अद्यापही जिल्ह्यातील बहुसंख्य करोना रुग्णांना असलेली लक्षणे सौम्य असल्याने ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेल्याचे दिसून आले असून सध्या ५३३५ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मंगळवारी दिवसभरात आढळलेल्या १०९१ नवीन रुग्णांपैकी ६१० रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रात आहेत. २३८ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर २४३ रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत. रुग्णांना दिसणारी लक्षणे अत्यंत सौम्य स्वरूपाची आहेत. मात्र असे असले तरी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी मुखपट्टी वापरासह सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंगळवारी आढळलेल्या १०९१ नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या १४ लाख ६८ हजार ८५६ एवढी झाली आहे. राज्य सरकारच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने दैनंदिन अहवालाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी करोना प्रतिबंधात्मक नियमांच्या पालनाबाबत गाफिल न राहण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.