पुणे : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित जिल्हा पर्यटन विकास आराखड्याला गती देण्यासाठी येत्या दोन महिन्यांत आराखड्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट- डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. हे काम एका खासगी संस्थेला देण्यात आले असूून, डीपीआर झाल्यानंतर आराखड्याची पुढील तीन वर्षांत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक, कृषी क्षेत्रासह निसर्गाच्या सान्निध्यातील अनेक ठिकाणे आहेत. जिल्ह्याची भौगोलिक वैविध्यता पाहता पुणे जिल्ह्यात पर्यटन विकास आराख़डा करण्याचे नियोजित आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही हा आराखडा तातडीने करण्याचे आदेश पवार यांनी दिले होते.
‘शहर आणि जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधील ऐतिहासिक ठिकाणे, धार्मिक महत्त्वाची ठिकाणे, किल्ले, स्मारके पर्यटन नकाशावर येण्याच्या दृष्टीने एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून प्रयत्न करावेत,’ अशीही सूचना पवार यांनी केली होती. त्यानुसार, पर्यटन आराखडा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. धार्मिक, ऐतिहासिक, गड किल्ले, वैद्यकीय उपचार, कृषी पर्यटन, नैसर्गिक पर्यटन यासारख्या मुद्द्यांच्या आधारे पर्यटनाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात एका खासगी कंपनीला पर्यटनाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडून येत्या दोन महिन्यांत डीपीआरचा अहवाल तयार होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.