पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी तीस वर्षांच्या एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यात आला आहे. या आराखड्याची तीन टप्प्यांत अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्यासाठी १ लाख २६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो मार्गांचा विस्तार, पीएमपीचे सक्षमीकरणाबरोबरच, नवे बीआरटी मार्गांचे जाळे विकसित करण्याला या आराखड्यात प्राधान्य देण्यात आले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या एकूण २ हजार ५५० चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्राचा विचार करून हा आराखडा करण्यात आला आहे. या आराखड्याचे सादरीकरण मेट्रोचे व्यवस्थाकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे केले. त्यानुसार पुढील तीस वर्षांत २७६ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका, सहा नवे बीआरटी मार्ग विकसीत करण्यात आले आहेत.
पीएमपी ही पुण्याची प्रमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असली तरी, तिचा केवळ १० टक्के वापर होत आहे. त्यामुळे पीएमपीचे सक्षमीकरण करण्याची बाब या आराखड्यात निदर्शनास आणून देण्यात आली. वाढती लोकसंख्या आणि पीएमपीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या लक्षात घेता पुढील दहा वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात ८ हजार १३ गाड्यांची आवश्यकता आहे. सन २०५४ मध्ये ११ हजार ५६४ गाड्यांचा ताफा प्रस्तावित करण्यात आला आहे.
२४६ किलोमीटरचे मेट्रोमार्ग
शहरात एकूण २४६ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्गिका करण्यात येणार आहेत. त्यामधील वनाज ते चांदी चौक, रामवाडी ते वाघोली या विस्तारित मार्गांचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. याशिवाय, जिल्हा न्यायालय ते येवलेवाडी, विद्यापीठ चौक ते देहू रस्ता, खराडी ते खडकवासला, निगडी ते चाकण, हडपसर ते सासवड रस्ता, हडपसर ते लोणी काळभोर असा एकूण १४८ किलोमीटर तसेच जिल्हा न्यायालय ते आळंदी, वाकड चौक ते शेवाळेवाडी, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एचसीएमटीआर या १२८ किलोमीटर अशा एकूण २७६ किलोमीटर लांबीचा मार्ग करण्यात येणार आहे.
१८ नवे बसमार्ग
पीएमपीचे ६४१ किलोमीटर लांबीचे १८ नवे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. तर दहा टर्मिनलची उभारणी करण्यात येणार आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीत सहा नवे बीआरटी मार्ग सुचविण्यात आले असून त्यामध्ये रावेत ते राजगुरूनगर, गवळी माथा चौक ते शेवाळेवाडी, रावेत ते तळेगाव दाभाडे, चांदणी चौक ते हिंजवडी या ११७ किलोमटीर लांबीच्या मार्गाबरोबरच लोणी काळभोर ते केडगाव, भूमकर चौक ते चिंचवड चौक या ४६ किलोमीटर लांबीच्या मार्गांचा समावेश आहे.
वाहतूक पोलिसांचा महापालिकेवर ठपका
वाहतूक पोलिसांकडूनही वाहतूक कोंडीसंदर्भात या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी रस्त्यांचा पृष्ठभाग योग्य नसल्यामुळे आणि महापालिकेकडून रस्ते दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात आले. शहरातील वाहतुकीचा वेग सरासरी अठरा किलोमीटर आहे. मात्र, पृष्ठभाग योग्य नसल्यामुळे गर्दी नसतानाही हा वेग वाढत नाही, असा दावा करण्यात आला.