पुणे : उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदांचे आयोजन करण्यात आले. लहान-मोठ्या उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही परिषद प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात आली. पुणे विभागात या परिषदेच्या माध्यमातून एकूण २१ हजार ७३७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक १६ हजार ५८१ कोटी रुपयांची गुंतवणूक एकट्या पुणे जिल्ह्यात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्योग विभागाच्या वतीने या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्रांच्या माध्यमातून पुणे विभागात मार्च महिन्यात या परिषदा घेण्यात आल्या. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रत्येक जिल्ह्यांत गुंतवणूक परिषद झाली आहे. या परिषदेच्या माध्यमातून पुणे विभागात एकूण ३०२ सामंजस्य कराराद्वारे २१ हजार ७३७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यातून ४२ हजार ५३४ रोजगार निर्मिती होणार आहे. पुढील दोन वर्षांत ही गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा…‘या’ पदासाठी मीच पात्र! अधिकारीच जेव्हा थेट मंत्र्यांना पत्र लिहितो तेव्हा…

पुणे विभागात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७२ सामंजस्य करारांद्वारे १६ हजार ५८१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यातून २९ हजार १३ रोजगारनिर्मिती होणार आहे. त्याखालोखाल कोल्हापूर जिल्ह्यात ५२ सामंजस्य करारांद्वारे १ हजार ५३० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्यातून ३ हजार २२९ रोजगार निर्माण होतील. सोलापूर जिल्ह्यात ६२ सामंजस्य करारांद्वारे १ हजार ४८१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्यातून ४ हजार १६६ रोजगार निर्माण होतील. सातारा जिल्ह्यात ५६ सामंजस्य करारांद्वारे १ हजार ११६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, २ हजार ८८६ रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. सांगली जिल्ह्यात ६० सामंजस्य करारांद्वारे १ हजार २७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, ३ हजार २४० रोजगार निर्मिती होईल, असे सूत्रांनी सांगितले.

पुणे विभागातील गुंतवणूक
जिल्हा – सामंजस्य करार – गुंतवणूक (कोटी रुपयांत) – रोजगार

पुणे – ७२ – १६५८१ – २९०१३

कोल्हापूर – ५२ – १५३० – ३२२९
सोलापूर – ६२ – – १४८१ – ४१६६

सातारा – ५६ – १११६ – २८८६
सांगली – ६० – १०२७ – ३२४०
एकूण – ३०२ – २१७३७ – ४२५३४

हेही वाचा…बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा ; येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशांसाठी सीईटी सेलकडून अंमलबजावणी

देशात सर्वाधिक गुंतवणूक होणारे राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखले जाते. त्यातही महाराष्ट्रातील पुण्यात होणारी गुंतवणूक मोठी आहे. वर्षभरात राज्यस्तरीय एकच गुंतवणूकदार परिषद घेण्याऐवजी प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर अशा परिषदा नियमितपणे घ्यायला हव्यात. यामुळे गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. मराठा चेंबरच्या वतीनेही गुंतवणूक वाढविण्यासाठी उपक्रम आयोजित केले जात आहेत. – प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune division attracts rs 21 thousand crore investment pune district leads with rs 16 thousand crore in district level investment conference pune print news stj 05 psg
Show comments