पुणे: ‘महावितरण’च्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये पुणे प्रादेशिक विभागाने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला आहे. ‘महावितरण’च्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी ही माहिती दिली. ‘विभागातील ६ हजार ८५८ अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासह विद्युत अभियांत्रिकीचे ९ हजार ५०० विद्यार्थी, १ लाख २६ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन विभागातर्फे करण्यात आले होते,’ असेही पवार यांनी स्पष्ट केले.
महावितरणच्या राज्यभरातील २५ लघु प्रशिक्षण केंद्रांतून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. गेल्या आर्थिक वर्षांत पुणे लघु प्रशिक्षण केंद्राने २८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. त्यानुसार नाशिक येथील महावितरणच्या मुख्य प्रशिक्षण व सुरक्षा विभागाने जाहीर केलेल्या मानांकनात पुणे परिमंडलाचे लघु प्रशिक्षण केंद्र सलग तिसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे, असे पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, ‘कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांवर भर देण्यात येत आहे. महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रेय बनसोडे यांनी सहकार्य केले, तर लघु प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांनी गेल्या आर्थिक वर्षात १०५ प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले.
यात अभियंते, अधिकारी, नियमित व बाह्यस्रोत कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, अप्रेंटीस, विविध एजन्सीचे कर्मचारी अशा ६ हजार ८५८ जणांना प्रामुख्याने सौरऊर्जेसह विद्युत सुरक्षा, उपकेंद्र व वितरण यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती, अत्याधुनिक मीटरींग इन्फ्रास्ट्रक्चर, सौरऊर्जा, विद्युत वाहने, वीजचोरी रोखण्याच्या उपाययोजना, प्रथमोपचार, ताणतणाव व्यवस्थापन, वीजबिलांचे अचूक बिलिंग इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले.’
पुण्यातील ३३ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकीच्या नऊ हजार विद्यार्थांशी थेट संवाद साधून वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडामोडी, वीजसुरक्षा व डिजिटल ग्राहकसेवा यांची माहिती देण्यात येते. तसेच, घरगुती व सार्वजनिक वीजसुरक्षा, डिजिटल ग्राहकसेवा, वीजबचत आदींबाबत शहरी व ग्रामीण भागात मेळावे, कार्यशाळा व प्रशिक्षण वर्गांद्वारे सुमारे एक लाख नागरिकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले आहे. – राजेंद्र पवार, मुख्य अभियंता पुणे विभाग