पुणे : दिवाळी संपताच शहरात लूटमार करणारे चोरटे सक्रिय झाले आहेत. धनकवडी, खराडी, हडपसर भागात लुटमारीच्या घटना घडल्या. पुणे – सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादर महिला आणि त्यांची सून साेमवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास काशीनाथ पाटील नगर परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.
नगर रस्त्यावरील खराडी भागात एका टेम्पोचालकाला धमकावून चोरट्यांनी मोबाइल संच आणि रोकड असा १० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी चोरटा प्रतीक योगेश सोनवणे (वय १९, रा. विकासनगर, घोरपडी) याला अटक केली. याबाबत एका टेम्पोचालकाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेम्पो नादुरुस्त झाल्याने टेम्पोचालकाने टेम्पो खराडी भागात रस्त्याच्या कडेला लावला. टेम्पोत ते झोपले. त्यावेळी चोरटा सोनवणे आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार तेथे आला. टेम्पोचालकाला धमकावून त्याच्याकडील रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून सोनवणे आणि साथीदार पसार झाला. टेम्पोचालकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या सोनवणेला पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर तपास करत आहेत.
वानवडीतील राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातून निघालेल्या एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावून नेण्यात आला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातून निघाली होती. त्यावेळी चोरट्याने तिच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावून नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पसार झालेल्या विठ्ठल मनोहर खोंडे (वय ३१, रा. वानवडी) याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे तपास करत आहेत.