अवयवदानाविषयी समाजात अजूनही असलेले गैरसमज दूर करण्यासाठी फॅमिली डॉक्टर सरसावले आहेत. ‘पुणे डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्ट’ या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे रविवारी (५ एप्रिल) ‘वॉकेथॉन’ या चालण्याच्या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून त्याद्वारे अवयवदानाचा संदेश दिला जाणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष डॉ. संताजी कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपाध्यक्ष डॉ. गिरीश कामत, डॉ. पी. बी. चव्हाण, डॉ. विश्वजित चव्हाण, ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी’च्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले आदी या वेळी उपस्थित होते. ५ एप्रिल रोजी सकाळी ६.१५ वाजता सारसबागेजवळील सणस मैदानापाशी जमून ७ वाजता ही वॉकेथॉन निघणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे यांच्यासह राज्याच्या अवयवदान जनजागृती मोहिमेची ब्रँड अँबॅसडर जुही पवार ही देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. वॉकेथॉनच्या निमित्ताने तीनशे डॉक्टरांसह खासदार शिरोळे यांनीही अवयवदानाचा अर्ज भरल्याचे कदम यांनी सांगितले.
पुण्यात केवळ ६५ मेंदू मृत व्यक्तींचे अवयवदान!
पुण्यात १९९७ मध्ये पहिले अवयवदान करण्यात आले. त्यानंतर गेल्या १७ वर्षांत केवळ ६५ मेंदू मृत व्यक्तींचे अवयवदान झाले असल्याची माहिती ‘झेडटीसीसी’च्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली. या ६५ अवयवदानांमधून ११५ जणांवर मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली, तर १६ जणांवर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. ‘अवयवदानाविषयी सामान्यांना असलेली माहिती आणि अवयवदानाचा दर कमी असून याबद्दल जनजागृतीची आवश्यकता आहे. असे असले तरी या वर्षी सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये पुण्यात ४ अवयवदाने झाली आहेत. हे देखील चांगले चित्र आहे,’ असे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा